आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीएपीचा तुटवडा:शेतकऱ्यांना पेरणीसाठी मृगात जोरदार पावसाची प्रतीक्षा,खत-बियाणे महागले

उमरगा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उमरगा तालुक्यात 72 हजार 200 हेक्टरवर खरीप पेरणी

यंदाच्या उन्हाळ्यात सर्वाधिक तापमान निर्माण झाल्याने उन्हाळ्यात सर्वाधिक झळा नागरिकांना सोसाव्या लागल्या. पावसाला सुरुवात झाल्याने पेरणीची तयारी करण्यात शेतकरी गुंतला आहे. मध्यंतरी अवकाळी पाऊस झाला. रोहिणी नक्षत्रात पावसाने बऱ्यापैकी सुरुवात केली होती. सद्या मृग नक्षत्राला सुरुवात झाली असल्याने शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे. मात्र, दुसरीकडे खत, बियाणे महागले असून डीएपी मिळेना झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. उमरगा तालुक्यात खरीप पेरणीचे सर्वाधिक क्षेत्र असल्याने बियाणे अन् खताच्या खरेदीसाठी पैशाची शेतकऱ्यांना जमवाजमव करावी लागत आहे. तालुक्याच्या भौगोलिक क्षेत्रात ७२ हजार दोनशे हेक्टर क्षेत्र खरीप पेरणीचे असून गतवर्षी अतिवृष्टीने काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले होते. यंदा खरीप क्षेत्र ८७ हजार २८० हेक्टर झाले आहे. खरीप हंगामातील खरीप ज्वारी, तूर, उडीद, मूग, सोयबीन या प्रमुख पिकाच्या उत्पादनावर शेतकऱ्यांचे वार्षिक गणित अवलंबून असते. खत विक्रेत्यांकडे विविध कंपन्यांचे खते उपलब्ध झालेली असली तरी सम्राट डीएपी खताची मागणी मोठी आहे. मात्र, अत्यल्प साठा उपलब्ध झाल्याने झटक्यात विक्री झाल्याने बाजारात सम्राट खत मिळत नाही. तालुक्यातील विक्रेत्यांनी दोन हजार मेट्रिक टन सम्राट डीएपी खताची मागणी केली होती. मात्र, केवळ तीनशे टन डीएपी उपलब्ध झाला होता. आयपीएल, इफ्को, आरसीएफ, महाधन कंपनीचे बाजारात खत उपलब्ध नाही. काही विक्रेत्याकडून आगाऊ रक्कम घेऊन विक्री केल्याची शेतकऱ्यांतून चर्चा होत आहे. सम्राट डीएपीला दुसऱ्या पर्याय असल्याची माहिती खत, बियाणे विक्रेते संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत माणिकवार यांनी दिली रोहिणी नक्षत्रातील पावसाचे आगमन झाले असल्याने मृग नक्षत्रातील दमदार पावसाचे प्रतिक्षेत शेतकरी आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचे नियोजन आहे, अशा शेतकऱ्यांनी आगोटी पेरणी केली. बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असल्यामुळे शेतकरी दमदार पावसाची वाट पाहत आहे. दररोजच ढगाळ वातावरण तयार होते अधूनमधून झालेल्या पावसाने तण वाढले आहे. याबाबत बोलताना तालुका कृषी अधिकारी सागर बारवकर म्हणाले की, शेतकऱ्यांचा सर्वाधिक कल सम्राट डीएपी खताकडे आहे, त्याशिवाय २० : २० : ०:१३, युरिया व एस एस पी ची मात्रा डीएपी खतासाठी पर्यायी आणि उपयुक्त आहे. शेतकऱ्यांनी शक्यतो घरगुती असो की, पिशवीतले सोयाबीन बियाण्यांची पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.

सोयाबीनच्या पेरणीला शेतकऱ्यांची अधिक पसंती असल्यामुळे क्षेत्र वाढत आहे. घरगुती बियाणांचा वापर होत असला तरी महाबिजच्या बियाणाला प्राधान्य दिले जात आहे. मात्र, यंदा बियाणांची आवक कमी आहे. ३० किलो पिशवीचा दर गत वर्षी दोन हजार २५० रुपये होता, यंदा तीन हजार ९०० झाला आहेङ तरीही महाबीज बियाणाची मागणी होत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी अन्य कंपन्यांच्या बियाणांची खरेदी सुरू केली आहे. तालुक्यात खत, बियाणे विक्री दुकानांची संख्या जवळपास ७५ होती. कोरोना लॉकडाऊन झाल्याने व्यवसाय मंदावला होता. मात्र, ऑनलॉक स्थिती नंतर खत, बियाणे विक्री दुकानांची संख्या वाढली. विक्रीत पारदर्शकता ठेवण्यासाठी खताची विक्री ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय झाल्याने पॉस मशीनद्वारे खत विक्री सुरूवात आहे.

बातम्या आणखी आहेत...