आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेरमाळा कळंब तालुक्यातील दहिफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डाॅक्टरच्या हलगर्जीमुळे एका शेतकऱ्याला जीव गमवावा लागल्याची घटना शुक्रवारी घडली होती. याप्रकरणी ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकून संबंधितांवर कारवाई होणार नाही, तोपर्यत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली.
यामुळे येथील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह चौघांची बदली करुन ग्रामस्थांची बोळवण करण्यात आली. ग्रामस्थ संबंधितांवर निलंबनाची मागणी करत आहेत. दहिफळ येथील सुभाष भातलवंडे यांनी आजारपणास कंटाळून दुपारी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, ऐनवेळी मुलगा प्रविण तेथे आला. त्याने वडील सुभाष यांचा फास सोडवला. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गोरखनाथ मुंढे यांनी ‘आज सुटी आहे’, असे म्हणत उपचार करण्याऐवजी टाळाटाळ केली.
उपचार तथा तपासणीसाठी यंत्र नाही, असे म्हणत रुग्णाला हातही लावला नाही. वेळेत उपचार न मिळाल्याने सुभाष यांचा मृत्यू झाला. हे ग्रामस्थांना समजल्यावर संतप्त जमाव केंद्रात आला. ग्रामस्थांनी याप्रकरणी डॉ. मुंढे व अन्य कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार नाही तोपर्यंत मृतदेहही ताब्यात घेणार नसल्याचे म्हटले. यामुळे पोलिस व तालुका आरोग्य अधिकारी जे. एन. सय्यद तेथे आले. त्यांनी ग्रामस्थांचा आक्रमकपणा पाहून दोन वैद्यकीय अधिकारी, लिपिक, आरोग्य सहायकाची बदली करणार असल्याचे सांगितले. सध्या सुटी असल्याने ही कारवाई सोमवारी होणार आहे.
यामुळे ग्रामस्थांनी शवविच्छेदनासाठी कुलूप काढण्यास परवानगी दिली. आरोग्य केंद्राची प्रतिमा मलिन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सय्यद यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोरखनाथ मुंडे व डॉ. किसन लोमटे यांची ग्रामस्थांशी सतत वाद होत असल्याच्या कारणावरून तर कनिष्ठ सहायक एस. ए. सुतार, आरोग्य कर्मचारी आर. ए. घोणसे यांना यंत्रणा अद्ययावत न ठेवल्यामुळे आरोग्य केंद्राची प्रतीमा मलिन केल्याचा ठपका ठेवून बदली केली. त्याचा रितसर अहवाल वरिष्ठांना देण्यात आला आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कामात कुचराई केली. यात शेतकऱ्याचा जीव गेला. चांगला स्टाफ मिळेपर्यंत आमचा लढा सुरू राहील. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. -चरणेश्वर पाटील, सरपंच.
पोलिस जीपच्या प्रकाशात करावे लागले मृताचे शवविच्छेदन
शवविच्छेदन करताना अचानक विद्युत पुरवठा बंद पडला. त्यावेळी शासनाने दिलेले जनरेटर, ग्रामपंचायतीने पुरवलेले साहित्यच उपलब्ध नसल्याचे दिसून आले. यामुळे अंधार निर्माण झाला. यामुळे पुन्हा ग्रामस्थ संतप्त झाले. तेव्हा येरमाळ्याचे पोलिस उपनिरीक्षक अतुल पाटील, पोलिस कर्मचारी आनंद वाटोरे, बीट अंमलदार प्रकाश चाफेकर यांनी ग्रामस्थांची समजूत काढली. नंतर चक्क मोबाइलच्या प्रकाशात नंतर जीपचे हेडलाइट्स लावून शवविच्छेदन करण्याची वेळ आली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.