आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊस:शेतकऱ्यांनी २०० किमीवरील कारखान्यास पाठवला ऊस, वाहनांची मिरवणूक

वाशी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सभासद असूनही स्थानिक कारखान्याने ऊस नेला नाही. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी २०० किलोमीटर अंतरावरील कारखान्याला ऊस पाठवला. दूरच्या कारखान्याने शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी घेतल्याने आनंदीत शेतकऱ्यांनी गुरुवारी रात्री ८ वाजता शेवटची खेप घेऊन जाणाऱ्या वाहनाची जल्लोषात मिरवणूक काढली. दरम्यान, कृषी विभागाने केलेल्या सर्व्हेनुसार गुरुवारपर्यंत तालुक्यातील ३० हेक्टरवर ऊस उभा असल्याची आकडेवारी मिळाली आहे. पुढील काही दिवसात यात आणखी वाढ होऊ शकते. त्यामुळे राहिलेल्या ऊसासाठी जबाबदार कोण? हा प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत. आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ शुगर वर्क्सकडून वाशी येथील शिवशक्ती सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालवण्यास घेण्यात आला आहे. त्यामुळे वाशी येथील कारखाना भैरवनाथ शुगर वर्क्स युनिट ५ या नावाने आमदार सावंत यांचे पुतणे व कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव सावंत व्यवस्थापन पाहत आहेत. करारानुसार सभासदांचा ऊस घेऊन जाणे बंधनकारक असताना यावर्षी अतिरिक्त उसाचे कारण देत कारखान्याकडून शेतकऱ्यांना कात्रीत पकडण्याचे काम झाल्याचे दिसून आले. त्यामुळे ऊस तोड मजूर, वाहतुकदारांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. वाशी येथील शेतकरी राजेश माणिक चेडे व अशोक विनायक चेडे या शेतकऱ्यांना मिळून १० एकर ऊस होता. तसेच घरातील सहा सदस्य सभासद आहेत.

फेब्रुवारीत ऊसाला १२ महिने लोटून गेल्याने पाणी बंद करा, असे वाशी येथील कारखान्याच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. चेडे बंधूंनी उभ्या उसाचे पाणी बंद केले. मात्र एप्रिल महिना संपला तरी ऊस तोड मिळाली नाही. कारखान्याने २ व ३ एप्रिल रोजी विविध दैनिकात ९ एप्रिल २०२२ रोजी कारखाना बंद करणार असल्याचे जाहीर प्रकटन काढत कारखाना बंद करण्यात आला. त्यामुळे चेडे यांनी १८० किलोमीटर दूर असलेल्या अक्कलकोट येथील कारखान्याशी संपर्क करून ऊसतोड सुरू केली. अक्कलकोट येथील कारखान्याने ५५० टन ऊस तोडून गाळपासाठी नेला. यामुळे शेतकऱ्यांनी गुरुवारी ऊस वाहतूक करणाऱ्या शेवटची खेप घेऊन जाणाऱ्या ट्रकला हार-फुलांनी सजवले. चालकांना फेटे बांधले. वाशी येथील पारा चौकात एक तास फटाक्यांची आतषबाजी करत बँडच्या निनादात वाहने रवाना केली.

बातम्या आणखी आहेत...