आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा व सांगवी (काटी) शिवारातील तीन विद्युत रोहित्रातील सुमारे सहाशे ते सातशे लिटर ऑइलची चोरी झाल्यामुळे मागील पाच ते सहा दिवसांपासून येथील विद्युत रोहित्र बंद असल्यामुळे वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ऑईल चोरी प्रकरणी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तामलवाडी पोलिस स्टेशनमध्ये रितसर फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला आहे. मात्र, दुसरीकडे ऑईल अभावी विद्युत रोहित्र बंद ठेवल्यामुळे शेतकरी संतापले आहेत. याच कटकटीला वैतागून सोमवारी (दि.६) मार्च रोजी माळुंब्रा येथील शेतकऱ्यांनी ३३ केव्ही उपकेंद्रासमोर ठिय्या केला. रब्बी हंगामाची पिके शेवटच्या टप्यात असून अनेक शेतकऱ्यांची ऊसाची लागवड सुरु आहे.
अशातच विद्युत रोहित्रातील ऑईलची चोरी झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. उसाला आळवणी देता येत नसल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. महावितरणचे कर्मचारी ऑईल उपलब्ध होईल तेंव्हाच वीजपुरवठा सुरळीत करु असे सांगत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे. संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी भाजप किसान सेलचे तालुका अध्यक्ष गजानन वडणे, प्रभाकर वडणे, राजकुमार वडणे आदी शेतकऱ्यांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.