आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआगारातील दुरावस्था झालेली बस दुरुस्तीसाठी राखीव ठेवली होती. मात्र, त्यानंतरही ही बस प्रवाशांच्या सेवेसाठी पाठवली होती. या बसच्या खिडकीच्या काचा फुटलेल्या होत्या. त्याखाली दमदार सरकारची असलेली जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होऊन थेट अजित पवारांच्या माध्यमातून विधी मंडळात पोहोचली होती. त्याची शासनाने दखल घेऊन यास कारणीभूत असलेल्या आगारातील तीन कर्मचाऱ्यांना गुरुवारी निलंबित केले. यात आणखी काही जणांवर कारवाईचे संकेत मिळत आहे. भूम आगारात ६८ बसेस आहेत. त्यापैकी एमएच २० बीएल ०२०६ या क्रमांकाची एसटी बसची स्थिती बिकट होती. त्या बसच्या पूर्ण खिडक्या खराब होऊन त्यांच्या सर्व काचा फुटलेल्या हाेत्या. त्यामुळे त्या बसेसला दुरुस्त करण्यासाठी तिला कार्यशाळेत लावले होते. मात्र, प्रवाशांना सेवा देण्यासाठी ही बस मार्गस्थ करण्यात आली होती.
या दुरावस्था असलेल्या एसटी बसवर दमदार सरकार या नावाची जाहिरात लावलेली होती. विशेष म्हणजे त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावलेले होते. त्यामुळे या बसचे फोटो साेशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. त्यामुळे हा विषय विरोधी पक्षनेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दि.२८ फेब्रुवारी रोजी विधिमंडळात मांडत दळभद्री प्रकार व सरकार म्हणत शासनावर टीका केली होती. या सर्व प्रकाराची शासन आणि महामंडळाने दखल घेतली आहे. संबंधितांवर कारवाईचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार भूम येथील आगार व्यवस्थापक विनोद अलकुंटे यांनी खिडक्या नसणारी एसटी बस फेरीसाठी बाहेर काढण्यास कारणीभूत असलेले आगारातील वाहन परीक्षक डी. बी. एडके, एस. एन. हराळ व ए. यु.शेख यांना निलंबित करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे या प्रकरणात आणखी काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे संकेत संबंधित प्रशासनाकडून मिळत आहे. ज्या एसटी बसचे फोटो विधिमंडळात पोहोचले होते. ही एसटी बस खरंतर कामासाठी राखीव ठेवण्यात आली होती. तसा अहवाल वरिष्ठांना पाठवला असल्याची माहिती आगार प्रमुखांनी दिली आहे. हे प्रकरण आता सरकारच्या प्रतिष्ठेशी जोडले गेल्याने यात आणखी काय कारवाई करण्यात येणार तसेच या प्रकरणात आणखी कोणाचे बळी जाणार, याची चर्चा रंगली असून अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. त्यामुळे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टीकेमुळे महामंडळात खळबळ
अजित पवार यांनी थेट दमदार सरकारची जाहिरात दुरावस्था असलेल्या बसवर असून त्याचे फोटो व्हायरल झाल्याने सरकारचा समाचार घेत विधिमंडळात शासनावर टीका केली होती. विधिमंडळात याचे पडसाद उमटल्याने महामंडळात यामुळे एकच खळबळ उडाली आहे. परिणामी त्यांच्याकडून कारवाई सुरु करण्यात आली.
कर्मचाऱ्याचे स्पष्टीकरण,विद्यार्थ्यांची हेळसांड होऊ नये म्हणून बस काढली
निलंबित करण्यात आलेल्या तिन्ही कर्मचाऱ्यांना संपर्क साधला असता, या प्रकरणाशी आमचा काहीही संबंध नाही. दि.१५ फेब्रुवारी रोजी आगार प्रमुखांनी १२ वी व १० वी वर्गाची परीक्षा असल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांची हेळसांड होऊ नये, असे पत्र आगार प्रमुखांनी दिले होते. त्यामुळे ही बस बाहेर काढण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण कर्मचाऱ्यांनी दिले.
तिन्ही कर्मचाऱ्यांवर कारवाई
दुरूस्तीच्या कामासाठी राखीव ठेवण्यात आलेली बस प्रवाशांच्या सेवेसाठी बाहेर काढण्यात आली होती. त्यामुळे यास कारणीभूत तिन्ही वाहन परीक्षक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. - विनोद अलकुंठे , आगार प्रमुख, भूम.
प्रवाशांना जीव धोक्यात घालावा लागतो
प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. एसटी बसचा प्रवास हा सुरक्षित मानला जातो. मात्र येथील आगाराच्या गलथान कारभाराचे चित्र बसेसच्या स्थिती वरून दिसून येत आहे. मात्र, या एसटी बस गाड्यांची अशी अवस्था होण्यास कारणीभूत असणाऱ्यांवर कोण व कधी कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
भूम आगारामध्ये ६८ बस, अनेक कालबाह्य, अशी आहे आगारातील बसची स्थिती
भूम आगारात ६८ एस टी बस आहेत. त्यामध्ये लांब पल्ल्याच्या २६, मध्यम पल्ल्याच्या ४, ऑडनरी १५, शटल सेवा ७, हैदराबादसाठी २ अश्या गाड्या धावत आहेत. आगारातील अनेक गाड्या कालबाह्य झाल्या आहेत. या गाडीसारखी अनेक गाड्यांची स्थिती आहे. अनेक गाड्यांचे पत्रे निखळलेली आहेत. मात्र, यात जी बस कामासाठी राखीव ठेवली होती. त्या एसटी बसवर शासनाच्या चांगल्या कामाची पावती देणारी जाहिरात कशी लावण्यात आली. हा सद्या चर्चेचा विषय होत आहे.
आगार प्रमुखांना आला नेत्याचा फोन
आगारातील खराब बस व त्यावर असलेली जाहिरात ही बस मुद्दामहून शासनाची बदनामी करण्यासाठी ही बस बाहेर काढली, असा आरोप आमच्यावर केला जात असल्याचे आगार व्यवस्थापकांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.