आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्याय:अखेर ‘त्या’ शेतकऱ्याला मिळाले वीज कनेक्शन

तामलवाडी6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेतकऱ्याची सहा एकर जमीन ओलिताखाली

तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) येथील शेतकरी ज्ञानेश्वर विश्वंभर मगर यांनी चार वर्षांपूर्वी वीज जोडणीसाठी डिमांड भरूनही महावितरणने जोडणी दिली नाही, त्यामुळे सहा एकरांवरील ज्वारीचे पीक करपले होते. विहिरीत पाणी असूनही विजेअभावी जनावरांना पाणी पाजता येत नव्हते. दैनिक ‘दिव्य मराठी’ने यासंबंधी १२ फेब्रुवारीच्या अंकात ‘डिमांड भरूनही वीज कनेक्शन मिळेना, सहा एकरातील ज्वारी पाण्याअभावी करपली’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन संबंधित शेतकऱ्यास तत्काळ वीज जोडणीचे आदेश दिले होते. अखेर त्या शेतकऱ्यास वीज कनेक्शन मिळाले असून सहा एकर शेती ओलिताखाली आली आहे.

सांगवी (काटी) शिवारात ज्ञानेश्वर मगर यांची गट नंबर ७८० मध्ये सहा एकर शेतजमीन आहे. बँकेचे कर्ज घेवून विहिर खोदली, पाइपलाइनचे काम केले. वीज जोडणीसाठी माळुंब्रा येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रात डिमांड रक्कम चार वर्षांपूर्वीच भरली होती. त्यानंतर महावितरणने खांब रोवणे, तारा ओढणे, ट्रान्सफार्मर उभारणीचा ठेका खासगी गुत्तेदाराला दिला. ठेकेदाराने विजेचे खांब रोवून तारा ओढणी, ट्रान्सफार्मर बसवण्यापर्यंतची कामे केली. मात्र, कोणतेही कारण न देता एक महिन्याच्या आत अचानकपणे जोडणी केलेल्या विजेच्या तारा काढून नेल्या होत्या.

वीज जोडणीसाठी शेतकरी ज्ञानेश्वर मगर यांनी गेल्या तीन वर्षांपासून जिल्हाधिकारी कार्यालयापासून संबंधीत विभागाला शंभरेक निवेदने दिली. मात्र, कोणतीच कारवाई केली नव्हती. अखेर दिव्य मराठीने या शेतकऱ्याची व्यथा समोर आणली होती. अखेर त्या शेतकऱ्यास वीज जोडणी मिळाली. वृत्तानंतर शेतकऱ्यास वीज जोडणीसाठी राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनीही महावितरणकडे पाठपुरावा केला होता.

बिल भरून सहकार्य करावे
संबंधित शेतकऱ्याला नियमानुसार वीज कनेक्शन दिले असून, उर्वरित शेतकऱ्यांनी थकीत बिल भरून महावितरणला सहकार्य करावे. -पी. एन. कावरे, शाखा अभियंता, ३३ केव्ही उपकेंद्र, माळुंब्रा.

बातम्या आणखी आहेत...