आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील सिग्नल व्यवस्थेचा फुटबॉल झाला आहे. नगरपालिका व पोलिसांच्या लाथाळ्यांमुळे लाखो रुपये खर्चून उभारलेली ही यंत्रणा धूळखात पडून आहे. पोलिस विभागाने सिग्नल हँडओव्हर करून घेण्यासाठी तीन दिवसांपासून पालिका प्रयत्न करत आहे. मात्र, आम्ही केवळ यंत्रणा वापरू शकतो, देखभाल दुरुस्तीसाठी निधी नाही, तेव्हा आम्ही हँडओव्हर कसे करून घेणार, असा प्रश्न पोलिस उपस्थित करत आहेत. त्यामुळे दोन्ही विभागांच्या समन्वयातून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजमाता जिजाऊ चौक, महात्मा बसवेश्वर चौक, लहुजी वस्ताद साळवे चौक, संत गाडगेबाबा महाराज चौक येथे आठ वर्षांपूर्वी सिग्नल उभारले. मात्र, आतापर्यंत ते कधीच सलग दोन महिने सुरू राहिले नाहीत. दोन दिवसांपूर्वीच सिग्नल यंत्रणेची चाचणी घेतली. मात्र, अनेक सिग्नल आपोआप बंद पडत आहेत. दरम्यान, सिग्नल यंत्रणा पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी नगरपालिका तीन दिवसांपासून प्रयत्न करत असल्याचे मुख्याधिकारी वसुधा फड यांनी सांगितले. मात्र, सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाल्यावर ती वापरुन वाहतूक नियमनाची आमची जबाबदारी आहे. यंत्रणेच्या देखभालीसाठी पोलिसांकडे अतिरिक्त निधी येत नाही, त्यामुळे ही यंत्रणा आम्ही आमच्या ताब्यात कशी घेणार, असा प्रश्न वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अमित मस्के यांनी उपस्थित केला. वाहतूक पोलिस व पालिकेच्या टोलवाटोलवीत प्रश्न अडकला आहे.
सिग्नल नसल्याने शहरातील विविध चौकांमध्ये आहेत या समस्या
१. सिग्नल का बंद आहेत ? उत्तर : सिग्नल बंद नाहीत, पोलिसांकडून याचा योग्य वापर होणे आवश्यक आहे. २. गतवर्षी तीन लाख खर्चूनही उपयोग नाही ? उत्तर : इतका खर्च येत नाही, दरवर्षी एखाद्या लाखामध्ये देखभाल होऊ शकते. ३. वारंवार सिग्नल बंद पडण्याचे काय कारण ? उत्तर : वापर बंद झाल्यानंतर रोज ते ब्लिंक मोडवर ठेवावे लागतात. पूर्ण बंद केल्यावर त्याची बॅटरी उतरते. रोज बॅटरी चार्ज करणे शक्य नाही. यामुळे वारंवार बिघाड होतोय. ४. आता काय उपाय केला जात आहे ? उत्तर : आम्ही ही यंत्रणा वाहतुक पोलिसांकडे हँडओव्हर करत आहोत. मात्र, तीन दिवसांपासून त्यांचा प्रतिसाद नाही.
मेन स्विच बंद करणारा कोण ?
सिग्नल वापरानंतर "ब्लिंक'''' मोडवर ठेवावे लागतात. मात्र, मेन स्विचच बंद केले जाते. यामुळे याची बॅटरी चार्ज होत नसून ते कायमचे बंद पडतात. दररोज बॅटरी चार्ज करणे शक्य नाही. तेव्हा दीर्घकाळासाठी सिग्नल बंद पडतात. यासाठीच कोणी मेनस्विच बंद करीत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करणार
वरिष्ठांना यासंदर्भात माहिती देण्यात येईल. आम्ही केवळ सिग्नल यंत्रणेचा उपयोग करू वाहतुक सुरळीत करू शकतो. देखभालीसाठी आमच्याकडे निधीही नसतो. यंत्रणा पालिकेनेच सांभाळावी. -अमित मस्के, सहाय्यक पोलिस निरीक्षक.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.