आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमाजाविषयी आस्था दाखवत कोरोना निर्मूलनासाठी शिक्षकांनी जमा केलेले ९३ लाख रुपये आता शिक्षकांच्याच हितासाठी वापरले जाणार आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या शिक्षक समन्वय समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात समितीत फूट पडून निधी खर्च करण्याबाबत दोन मतप्रवाह झाल्यामुळे काय निर्णय होणार याकडे, जिल्ह्यातील शिक्षकांचे लक्ष लागून होते.
जिल्ह्यात कोरोना काळात मोठा हाहाकार निर्माण झाला होता. अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. ऑक्सिजन व अन्य उपकरणांची वानवा भासत होती. समाजात अशी विपरीत परिस्थिती निर्माण झाली असताना शिक्षकांनी पुढे होऊन मदतीचा हात दिला होता. सर्व शिक्षक संघटनांनी एकत्रित आवाहन केल्यानंतर पहिल्यांना एक दिवसांचे वेतन दिलेले असतानाही पुन्हा दुसऱ्यांदा शिक्षकांनी एक दिवसांचे वेतन दिले होते. यातून तब्बल ८७ लाख रुपये जमा झाले होते. ही रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे सूपूर्त करण्यात आली होती. परंतु, त्याच वेळी शासनाचा कोरोना उच्चाटनासाठी मुबलक निधी आल्यामुळे व कोरोना लाट ओसरल्यामुळे निधी खर्च होऊ शकला नाही. व्याजासह हा निधी ९३ लाखापर्यंत गेला होता.
परंतु, हा निधी कोठे खर्च करावा याबद्दल निर्णय होत नव्हता. अखेर जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी बैठक बोलावून शिक्षक नेत्यांसोबत चर्चा केली. जिल्हा शिक्षक समन्वय समिती मधील सर्व सदस्यांनी ही रक्कम शिक्षकांच्या हितासाठी वापरण्यात येऊन त्यासाठी जिल्हा शिक्षक कल्याण मंडळ स्थापन करून रक्कम त्या खत्यमध्ये वर्ग करावी, अशी मागणी केली .त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जिल्हा शिक्षक मंडळ स्थापन करून निधी त्या शिक्षक कल्याण निधीमधे वितरीत करण्याचे आदेश दिले.यावेळी शिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर मोरे, शिक्षणाधिकारी माध्यमिक गजानन सुसर, उपशिक्षणाधिकारी उद्धव सांगळे उपस्थित होते. बशीर तांबोळी, बाळकृष्ण तांबरे, लालासाहेब मगर, कल्याण बेताळे, सुनील मुंढे, पवन सूर्यवंशी, नागसेन शिंदे यांनी भाग घेऊन शिक्षणाचे व शिक्षकांचे अनेक प्रश्न मांडले.
मूलभूत कौशल्यावर आधारित कार्यक्रम
विद्यार्थी आणि शिक्षकांच्या बाबतीत अनेक विषयांवर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी चर्चा केली. तसेच विद्यार्थ्यांसाठी मूलभूत कौशल्यावर आधारित कार्यक्रम लवकर आखण्यात यावा, असे डाएटला सांगितले असल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांनी मदत करावी, असेही आवाहन केले. त्या विषयावर पुढील २० एप्रिलपर्यंत आणखीन एक बैठकीचे आयोजन करावे असे सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.