आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिद्दीचे सीमोल्लंघन:सायकलींगदरम्यान हनुवटीला फ्रॅक्चर, २७ टाके: परिश्रमातून श्याम शिंदे दोनदा बनले आयर्नमॅन, १० वेळा हाफ आयर्नमॅन

चंद्रसेन देशमुख | उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनात जिद्द असली की यशाला गवसणी घालता येतेच, मात्र त्यासाठी प्रयत्न आणि परिश्रमाची जोड असायला हवी. उस्मानाबादचे श्याम शिंदे हे त्याचे उत्तम उदाहरण आहेत. त्यांनी प्रचंड परिश्रम, जिद्दीतून तब्बल दोनवेळा आयर्न मॅन बनण्याच्या विक्रमाला गवसणी घातली आहे. महत्वाचे म्हणजे हाफ आयर्न मॅन दरम्यान सायकलिंग करताना त्यांचा भीषण अपघात झाला होता. चेहऱ्यावरील हनुवटीचा भाग फ्रॅक्चर झाला,२७ टाके पडले. तरी त्यांनी जिद्द सोडली नाही.त्यांनी भारतात सुमारे १० वेळा हाफ आयर्न मॅन बनण्याचा बहुमान पटकावला आहे. प्रचंड कठीण असलेल्या या स्पर्धेत लोहपुरूषपदाचे दोनवेळा पदक मिळवणारे शिंदे हे जिल्ह्यातील पहिली व्यक्ती आहेत.

येथील श्याम शिंदे मुंबई महापालिकेत सब इंजिनिअर आहेत. दिवसभर नोकरी केल्यानंतर उरलेली वेळ कंटाळवाणी जात होती. रोजची दगदग, त्यातून येणारे नकारात्मक विचार, चिंता यामुळे त्यांनी व्यायामासाठी मुंबईतील एक फिटनेस ग्रुप जॉईन केला. पुढे ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरूवात केली. हैदराबादची हाफ मॅरेथॉन केल्यानंतर तर त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला.

कारण स्वत:साठी धावल्याबद्दल त्यांना पहिल्यांदाच मेडल मिळाले होते.त्यांनी पुढे अनेक मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला आणि पदकांची रेलचेल सुरू झाली. १ जुलै २०१८ च्या ऑस्ट्रिया येथील आयर्न मॅन स्पर्धेत त्यांनी सहभागी होण्याचा निश्चय केला.ही स्पर्धा प्रचंड कठीण असून, अवघ्या १७ तासांत पोहणे, सायकलिंग आणि धावणे, अशा तिन्ही प्रकारात पूर्ण करावी लागते.

अनेक दिवस सराव करून त्यांनी स्पर्धेत भाग घेतला आणि स्पर्धा जिंकून जिल्ह्यातील पहिले आयर्न मॅन होण्याचा मान पटकावला. प्रचंड जिद्दी असलेल्या शिंदे यांना पुढे काळाने गुडघे टेकायला लावले. २०१९ ला कोल्हापूरला झालेल्या हाफ आयर्न मॅन स्पर्धेत शिंदे यांच्या सायकलला भीषण अपघात झाला. त्यांच्या हनुवटी जवळ फ्रॅक्चर झाले आणि चेहऱ्याला तब्बल २७ टाके पडले. भीषण अपघातातून वाचल्याने जणू त्यांचा पुनर्जन्मच झाला.कोल्हापूरचे तत्कालिन पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी वेळेत उपचार करून शिंदे यांना धीर दिला.

अपघातातून सावरल्यानंतर शिंदे यांनी पुन्हा एकदा स्वत:साठी धावण्याचा निश्चय केला. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या मॅरेथॉन तसेच हाफ मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरूवात केली आणि पुन्हा पुन्हा त्यांच्या गळ्यात यशाचे मेडल पडू लागले.त्यांची प्रेरणा घेत उस्मानाबादच्या तरूण मंडळींनी उस्मानाबाद हाफ मॅरेथॉन सुरू केली असून, या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आता अन्य जिल्ह्यातील स्पर्धेत उस्मानाबादकर सहभागी होऊ लागले आहेत.

अपघातानंतरही जिद्द कायम, इस्टोनियाला जाऊन मिळवला बहुमान
सायकल अपघातानंतर श्याम शिंदे यांना नातेवाईक, मित्रांनी कठीण स्पर्धा सोडून देण्याचा सल्ला दिला. मात्र त्यांनी जिद्द सोडली नाही. हाफ मॅरेथॉनमध्ये सहज यश मिळवणाऱ्या शिंदे यांनी ६ ऑगस्ट (२०२२)रोजी इस्टोनिया देशातील टॅलीन शहरात आयर्नमॅन स्पर्धेत सहभाग घेत आयर्नमॅन होण्याचा दुसऱ्यांदा बहुमान पटकावला. दोन दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये हाफ आयर्न मॅन स्पर्धेतही सहभागी झाले. ज्या मार्गावर त्यांचा अपघात झाला होता, त्याच ठिकाणी जाऊन त्यांनी फोटो घेतले आणि ही स्पर्धाही जिंकली.

कोल्हापूर, हैदराबाद, मुंबई, पुणे येथील स्पर्धांत बाजी
शाम शिंदे यांनी देशभरात अनेक मॅरेथॉनमध्ये बक्षीसे मिळवलीच, पण कठीण, तीन व्यायाम प्रकारात पूर्ण करावयाच्या हाफ आयर्न मॅन स्पर्धेतही १० वेळा बाजी मारली. कोल्हापूर, हैदराबाद, दिल्ली येथे प्रत्येकी २ वेळा, सातारा, मुंबई, चेन्नई, पुणे येथे प्रत्येकी १, असे १० वेळा हाफ आयर्न मॅन बनले.

आयर्नमॅन होण्यासाठी या बाबी कराव्या लागतात पूर्ण
सलग १७ तासांत ही स्पर्धा पूर्ण करावी लागते. त्यात ३.८ किलोमीटर स्विमिंग, १८० किलोमीटर सायकलींग केवळ १० तास १० मिनिटांत पूर्ण करावी लागते. उर्वरित वेळेत ४२.२ किमी रनिंग करावी लागते. पूर्ण आयर्न मॅन स्पर्धा भारतात होत नाही. युरोपमध्ये या स्पर्धा होतात.व्यायामातूनच ऊर्जा मिळते, त्यामुळेच यश मिळत जाते, असे श्याम शिंदे सांगतात.

बातम्या आणखी आहेत...