आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील बदलांनुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर हाेतात. त्याप्रमाणे आठ दिवसांत भारतीय तेल कंपन्यांनी ७ वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ केली आहे. ३ एप्रिल रोजी पेट्रोलचा दर १.६४ पैसे तर डिझेलचे दर ०.८३ पैसे प्रति लीटरने वाढवले आहेत. २७ मार्चपासून ३ एप्रिलपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर साडेचार रुपयांनी वाढले आहेत. जिल्ह्यात ३ एप्रिल रोजी पेट्रोलचा सर्वाधिक दर कळंब येथे ११९.२६ तर सर्वात कमी तुळजापूर येथे ११८.३९ रुपये होता. दररोज पेट्रोल, डिझेलचे दर वाढत असल्याने महागाईचा भडका होत आहे.
गेल्या १८ महिन्यात पेट्रोलचे दर २९.९३ तर डिझेल २४.६९ रुपयांनी वाढले आहेत. यापूर्वी ४ ऑक्टोबर २०२० रोजी पेट्रोल ८८.८४ रुपये तर डिझेल ७६.७९ रुपये लिटर होते. दरम्यानच्या १८ महिन्यात पेट्रोलचे दर गगनाला भिडल्याने कुटुंबाचा मासिक खर्च सरासरी २० टक्क्यांनी वाढला आहे. कोरोना संकटाने गेल्या दोन वर्षात अनेकांचे रोजगार गेले. कुटुंबप्रमुखांना संसार तारेवरील कसरत करावी लागत आहे. त्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे काही महिन्यांपासून इंधनाचे दर तेजीत आहेत. पेट्रोलच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. १८ महिन्यात सप्टेंबर २०२१ मध्ये एकवेळा केवळ ३८ पैशांनी पेट्रोलचे दर कमी झाले होते. त्यानंतर दिवसेंदिवस भाव वाढत असल्याने सामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. ३ एप्रिल रोजी उस्मानाबाद शहरात पेट्रोल ११८.७७ तर डिझेलचा १०१.४८ रुपये प्रति लिटर होते. यामुळे आगामी काळात खासगी व महामंडळाच्या बसेसचे भाडे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
क्रूड ऑइल कमी झाले तरी पेट्रोल वाढते
आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलची किंमत कधीतरी वाढते. अनेकवेळा मोठ्या प्रमाणात कमीही होते. काही दिवसांपूर्वी क्रूड ऑइलचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाले होते. मात्र, देशात तेलाचे दर कमी झाले नव्हते, असे शहरातील काही विक्रेत्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले. केंद्र व राज्याचे टॅक्स नियमित वाढते आहेत. त्याचे परिणाम पेट्रोलच्या दरवाढीत होत आहे.
इंधन दरवाढ नियंत्रणात हवी
पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे दळणवळण खर्च सरासरी १५ ते २० टक्के वाढला. परिणामी दैनंदिन आवश्यक असलेल्या अनेक वस्तूंचे दर वाढले. प्रामुख्याने तेल, साबण, डिटर्जंट यासह अन्य वस्तुंच्या वाहतुकीसाठी दरवाढ झाली आहे. यामुळे महागाई वाढली आहे. महागाई नियंत्रणात आणायची असेल तर सर्वप्रथम इंधनाचे दर कमी करणे गरजेचे आहे. संजय कारंडे, व्यापारी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.