आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्जन:नळदुर्ग येथे बाप्पाला गणेश भक्तांनी दिला भावपूर्ण निरोप; 104 गणेश मंडळांची उत्साहात व शांततेत मिरवणूक

नळदुर्ग19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नळदुर्ग येथे ९ सप्टेंबर रोजी लाडक्या बाप्पाला गणेशभक्तांनी भावपूर्ण वातावरण निरोप दिला. सात ते आठ तास चाललेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर बोरी घाटावर गणेश विसर्जन केले. यावेळी बाप्पावर फुलांची तसेच गुलालाची उधळण करण्यात आली. जय भवानी गणेश मंडळासमोरील श्री समर्थ रावसाहेब बाबा पाटील वारकरी शिक्षण संस्था मेडसिंगा येथील विद्यार्थ्यांचा भजनाचा कार्यक्रम हा मिरवणुकीतील सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

मिरवणुकीत जय भवानी गणेश मंडळ, शिवशाही तरुण गणेश मंडळ, भोईराज गणेश मंडळ, जवाहर गणेश मंडळ, जय हिंद गणेश मंडळ व्यास नगर, नवचैतन्य गणेश मंडळ, धर्मवीर संभाजी तरुण गणेश मंडळ, न्यू चैतन्य गणेश मंडळ, शिवनेरी गणेश मंडळ, इंदिरा नगर गणेश मंडळ, माऊली गणेश मंडळ या मंडळांसह लहान-मोठी मंडळे सहभागी झाली होती. अतिशय शांततेत पार पडल्या. मिरवणुकीत लेझीम, लहान मुलांचा भजनी मंडळाचा संघ, झेंडा नृत्य, डफली व टिपऱ्यांचा खेळ तसेच डॉल्बीचा दणदणाट व हलग्यांच्या वाद्यात मिरवणुका पार पडल्या. मिरवणुकीदरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे-पाटील यांनी मिरवणुकीची पाहणी केली. मिरवणुकीत अशोक जगदाळे यांच्यासह काही राजकीय नेत्यांना नाचण्याचा मोह अनावर झाला.

नळदुर्ग पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या ५ बीट मधील ९७ गाव व तांड्यात एकूण १४० गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली यासाठी नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, सुधीर मोटे, पोलीस उपनिरीक्षक मुसा शाह,जीविशाचे धनंजय वाघमारे, अच्युत पोतदार यांच्यासह संबंधित बीटच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता. नगरपालिकेने ही विसर्जनाची चांगली तयारी केली होती.

मान्यवरांची उपस्थिती
शहराच्या मुख्य चावडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक जगदाळे यांनी पोलिस अधीक्षकांचे स्वागत केले. यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार, सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, मंडळ अधिकारी जयंत गायकवाड, तलाठी तात्यासाहेब रुपवनर, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, सरदारसिंह ठाकूर, यांच्यासह इत्यादी जण उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...