आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावी निकाल:अधिकारी होण्याच्या स्वप्नांना गवसणी, दिव्यांग इंद्रजित, सोनाली, दीपाची भरारी

लोहारा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या क्षेत्रात अपयश आले की काही तरी कारण सांगून मोकळे होणे हे ठरलेलेच आहे. परंतु जन्मतः दिव्यांग असूनही मनाशी ध्येय बाळगून त्यासाठी परिश्रम घेऊन कोणतेही कारण न सांगता यशस्वी होता येते हे लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांनी सिद्ध केले आहे. या शाळेतील ६ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. दिव्यांग शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. जन्मतः दिव्यांग त्यात घरची परिस्थिती अत्यंत गरीब असून हलाखीच्या परिस्थितीत या विद्यार्थ्यांनी संपादन केलेले हे यश कौतुकास्पद आहे.

इंद्रजित : विकलंगात्वर मात करत 93 % गुण

निवासी दिव्यांग शाळेतील विद्यार्थी इंद्रजित येणगे हा निलंगा तालुक्यातील चिलवंतवाडी येथील विद्यार्थी. घरची परिस्थिती अत्यंत गरीब. जन्मतःच आलेल्या दिव्यांगत्व. त्याच्या आजीने इंद्रजितला सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेत ठेवण्याचा निर्णय घेतला. तेथे पहिलीत प्रवेश झाला. न्यूनगंडामुळे तो एकटाच राहायचा. खूप चिडचिड करायचा. कमरेपासून दोन्ही पायांनी विकलांग असल्यामुळे स्वतःहून हालचालींवरही मर्यादा येत होत्या. मागील दहा वर्षांच्या निवासी दिव्यांग शाळेतील वास्तव्यात त्याच्यात अमुलाग्र बदल घडून आला. आपण दिव्यांग आहोत हे तो विसरून गेला होता. कारण त्याला त्याचे ध्येय गाठायचे होते. त्याप्रमाणे त्याने परिश्रम घेऊन अभ्यास केला. यात त्याच्या शाळेतील मुख्याध्यापक बालाजी नादरगे व शाळेतील शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केले. इंद्रजितने दहावीच्या परीक्षेत ९३.६० टक्के गुण मिळवले आहेत. इंद्रजितमध्ये आज नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. भविष्यात त्याला कॉम्प्युटर इंजिनिअर व्हायचे आहे.

सोनाली : ८२ % गुण, जिल्हाधिकारी व्हायचेय

सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेतील विद्यार्थिनी सोनाली शेखर बेळे. कमरेपासून खालील भागात जन्मतःच तिला दिव्यांगत्व आले. सोनालीच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तिचे आईवडील दोघेही मोलमजुरीसाठी नवसारी गुजरात येथे कुटुंबासमवेत वास्तव्यास आहेत. सोनाली दिवाळी व उन्हाळी सुटीमध्ये आजीकडे वास्तव्यास असते. प्रत्येक वेळी सुटीमध्ये शाळेनेच सोडायचे आणि परत घेऊन यायचे हा शिरस्ता मागील दहा वर्षांपासून सुरू आहे. सोनालीचे आईवडील वर्षातून केव्हातरी एकदा भेटायला येतात. सोनाली नेहमी आनंदी व हसतमुख असते. कोविडच्या संपूर्ण दोन वर्षांच्या काळात सोनाली ही शाळेतच वास्तव्यास होती. आपण आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे हीच जिद्द मनाशी बाळगून सोनालीने अभ्यास केला. त्यात खूप मेहनत घेऊन सोनालीने दहावीच्या परीक्षेत ९२.८० टक्के गुण मिळवले आहेत. सोनालीला भविष्यात जिल्हाधिकारी व्हायची इच्छा आहे.

दीपा : प्रतिकूलतेतून यश, डॉक्टर बनण्याचे स्वप्न

याच शाळेतील विद्यार्थीनी दीपा घोसले. तिचे वडील तुकाराम घोसले निलंगा तालुक्यातील नेलवाड या गावचे. भटक्या जमातीतील कुटुंब. तुकाराम घोसले यांच्या कुटुंबात जन्माला आलेल्या चार अपत्यापैकी तीन दिव्यांग. दीपाचे वडील तुकाराम घोसले हे व्यसनाधीन. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दीपाची आई मजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवत होती. दीपासह तीनही भावंड निवासी दिव्यांग शाळेत आली. दीपा ही अतिशय गुणी तिचे हस्ताक्षर तर अगदी मोत्यासारखे. चित्रकारीही अभिजात होती. अभ्यासातही खूप चुणचुणीत. दीपाने चांगले यश मिळवायचेच या जिद्दीमुळे प्रचंड अभ्यास केला. तिला तिच्या शिक्षकांनीही आवश्यक ते मार्गदर्शन केले. दीपाने जिद्दीने प्रतिकूलतेवर मात करीत दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत ९२.२० टक्के गुण मिळवले आहेत. गणित हा बहुतेकांना कठीण वाटणारा विषय, पण दीपाने गणितात १०० पैकी १०० गुण मिळवलेत. भविष्यात तिला वैद्यकीय शिक्षण घेऊन अस्थिरोग तज्ञ व्हायचे आहे असे तिने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...