आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:श्रीकृष्ण रक्त संकलन पेढीच्या माध्यमातून अनेकांना जीवनदान; रक्तदाता दिनी नियमित रक्तदात्यांचा सत्कार

उमरगा18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात १५ वर्षांपूर्वी तालुकास्तरावर पहिली रक्तपेढी सुरु करून श्रीकृष्ण रक्त संकलन पेढीच्या माध्यमातून अनेकांना जीवनदान देण्याचा प्रयत्न केलेला असून, ही उमरगावासीयांसाठी कौतुक आणि अभिमानाची बाब आहे. तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक अन शासकीय संस्थानी रक्तसंकलनास पुढे यावे, असे आवाहन प्रा. किरण सगर यांनी केले.

शहरातील श्रीकृष्ण रक्त संकलन केंद्रात जागतिक रक्तदाता दिन मंगळवारी (१४) साजरा करण्यात आला, त्यावेळी प्रा सगर बोलत होते. रक्तदाता दिनाचे औचित्य साधून श्रीकांत लोहार, गोविंद कांबळे, श्रीमती सरीता उपासे यांनी रक्तदान करून रक्तदाता दिवस साजरा केला.जेष्ठ समाजसेवक तथा अस्मिता विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. दामोदर पतंगे अध्यक्ष स्थानी होते.

यावेळी रोटरी अध्यक्ष डॉ पंडित बुटूकणे, सचिव व्यंकट गुंजोटे, मराठवाडा साहित्य परिषद प्रा. किरण सगर, डॉ. सागर पतंगे, डॉ अंबिका पतंगे उपस्थित होते. या वेळी नियमित रक्तदान करणारे सरिता उपासे, प्रा. सगर, प्रा. मारुती खमितकर, प्रवीण शिंदे, सुधीर कांबळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ दामोदर पतंगे म्हणाले की, रक्ताला पर्याय नसल्याने मानवाचेच रक्त मानवाला चालते. अशी कुठलीच कंपनी नाही जी कृत्रिम रक्त तयार करू शकेल. १९९५ पासून श्रीकृष्ण रक्त संकलन केंद्र कार्यरत असून, आतापर्यंत जवळपास ५० हजार गरजू रुग्णास रक्तपुरवठा केले आहे.

लोकसंख्येच्या एक टक्का व्यक्तींनी रक्तदान केल्यास गरजू रुग्णांना सहजरीत्या रक्त उपलब्ध होऊ शकते, त्यामुळे प्रत्येक पात्र व्यक्तींनी वर्षातून किमान एक वेळेस रक्तदान करावे, असे आवाहन केले. सौ. उपासे, गुंजोटे, कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. अभयकुमार हिरास यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. खमितकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विजय केवडकर, सुशांत सावंत, योगेश सोनकांबळे, ऋत्विक म्हेत्रे, श्री. खरोसे यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...