आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त हासेगाव (शि) येथे स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव करण्यात आला. कळंब तालुक्यातील हासेगाव (शि) येथील श्री लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व स्फूर्ती फाउंडेशन कळंब यांच्या वतीने हासेगाव (शि) येथे मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य सैनिकाचा गौरव व एकदिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक अनिल यादव होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा कार्यवाहक प्रमोद बाकलीकर उपस्थित होते. यावेळी विकास राऊत, सरपंच प्रायली गवळी, उपसरपंच अर्चना मळगे, वरिष्ठ अधिकारी संतोष राऊत, राजाभाऊ मळगे, स्फूर्ती फाउंडेशनचे शिवाजीराव गिड्डे, मकरंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पहिल्या सत्रात संघ व समरसता या विषयावर प्रा. विजय घोळवे यांनी माहिती विशद केली. दुसऱ्या सत्रात गोसंवर्धन व सेंद्रिय शेती याविषयावर जिल्हा गोसेवा प्रमुख नवनाथ खोडसे यांनी मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात मराठवाडा मुक्ती संग्राम या विषयावर प्रमोद बाकलीकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रावसाहेब गंभिरे, रविकांत गिरी, ज्ञानेश्वर पवार, ज्ञानेश्वर पवार, संतोष कानडे, सचिन गवळी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार स्फूर्ती फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजीराव गिड्डे पाटील यांनी केले.
जिल्हा कार्यवाहक प्रमोद बाकलीकर, जिल्हा संघचालक अनिल यादव यांच्या हस्ते शिराढोण, नागुलगाव, जवळा, गौरगाव, एकुरगा, देवधानोरा आदी गावातील लक्ष्मण बोंदर, दिनकरराव बोंदर, भालचंद्र वाटाणे, नारायण मिरगणे, शिवाजी थोरात या स्वातंत्र्य सैनिकासह यमुनाबाई बोंदर, काशीबाई बोंदर, द्रोपपदीबाई भोसले, समाबाई गायकवाड, प्रयागबाई नहाने या महिला स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव करण्यात आला. मराठवाडा मुक्ती संग्राम हा सर्वसामान्य नागरिकांचा उठाव होता. कोणताही नेता नसतात उभा राहिलेला संग्राम होता. विशेष म्हणजे यात महिलांचा उल्लेखनीय सहभाग होता. मोठा त्रास सहन करून या स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी स्वतःला झोकून दिले होते असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाहक प्रमोद बाकलीकर यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.