आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउस्मानाबाद जिल्ह्याला निसर्गाचे दान मिळाले आहे. बालाघाटच्या डोंगररांगा, घनदाट झाडी आणि ऐतिहािसक,धार्मिक स्थळांमुळे अनेक ठिकाणांना वेगळे महत्व आहे. उस्मानाबाद तालुक्यातील येडशीच्या रामलिंग परिसरात निसर्गाचा अविष्कार दिसतो. मंदिराचा परिसर आणि धबधब्यांमुळे परिसर रमणीय आहे.
पावसाने हा परिसर अधिकच विलोभनीय झाला आहे. मात्र हजारोंच्या संख्येने येणाऱ्या भाविक, पर्यटकांकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे एमएच २५ हेल्पिंग हँड या सामाजिक संस्थेच्या वतीने रविवारी(दि.२४) दिवसभर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. यासाठी पर्यटकांनाही आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी संस्थेने या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली होती. त्यानंतर आता पर्यटकांची वाढलेली गर्दी विचारात घेऊन ही मोहीम राबवण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. रामलिंग परिसराला निसर्गाने भरभरून दान दिलेले आहे. या परिसरात उंच डोंगर, वृक्षसंपदा,दरी, बंधारे, खळखळणारे पाणी, असा निसर्ग अनुभवता येतो.
पावसाळ्यात तर हा आनंद द्विगुणीत व्हावा, असे हे ठिकाण आहे. श्रावण महिन्यात श्री क्षेत्र रामलिंग दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. निसर्गाची किमया बघण्यासाठी जिल्ह्याबाहेरूनही पर्यटक गर्दी करतात.अगदी लोणावळा-खंडाळा, महाबळेश्वरला व्हावी तशी गर्दी आणितशीच अनुभूती या ठिकाणी मिळते. मात्र, या परिसरात पर्यटकांकडून स्वच्छतेकडे कमालीचे दुर्लक्ष केले जाते. कॅरिबॅग, पाणी बॉटल्स, कागदाचे-प्लास्टिकचे ग्लास आदी कचरा या परिसरात विखुरलेला दिसतो. हे राेखण्यासाठी म्हणून एमएच २५ हेल्पिंग हँड या सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला.
एमएच २५ हेल्पिंग हँड्स संस्थेचे स्वच्छतेसाठी आवाहन
रामलिंगला पर्यटकांची ओढ आहे. जसा आपल्याला सुंदर निसर्ग दिसतो, तसा आपण तो राखतो का?, प्लास्टिक, कचरा, पिशव्या कित्येक अशा गोष्टींमुळे रामलिंग पर्यटनस्थळ विद्रुप होत आहे, याचा तुम्ही कधी विचार केला का?. जर असंच चालत राहीले आणि उद्या रामलिंग हे पवित्र स्थळ आपल्या हलगर्जीपणामुळे अस्वच्छतेच्या तावडीत सापडले तर आपण पर्यटक सहजपणे या निसर्गाचे दर्शन घेऊ शकाल का. त्यामुळे वेळ गेलेली नाही. एमएच-२५ हेल्पिंग हँड्स संस्थेमार्फत आम्ही आपल्या रामलिंगला स्वच्छता मोहीम राबवत आहोत. आपण या मोहिमेत सहभागी होऊन येणाऱ्या पिढीला रामलिंग पर्यटनस्थळाचे महत्व स्वच्छता अभियानांतर्गत पटवून देऊया.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.