आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याची झळाळी उतरली:सोन्याचे दर 3 हजारांनी कमी; 8 महिन्यांत पहिल्यांदाच सोन्याची झळाळी उतरली

उस्मानाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आठ महिन्यांपूर्वी सोने धातूला मागणी असल्याने सोन्याचे दर थेट ५५ हजार ५०० रुपये तोळापर्यंत गेले होते. ते आता ५२ हजार ४२० रुपयांवर आले आहेत. मात्र, लग्नसराई कमी झाली असून आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयांची घसरण सुरु असल्याने आठ महिन्यात पहिल्यांदाच सोन्याची झळाळी उतरली दर तीन हजार रुपयांनी कमी झाले. तसेच चांदीच्या दरातही एक हजाराची घसरण झाल्याचे शहरातील सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले.

कोरोना नंतर बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढायला लागली तशी सोन्याच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत घट झाली होती. वर्षभरापूर्वी सोन्याचे दर कमी झाले होते. ग्राहकांकडून सोन्यास पुन्हा पसंती देण्यात येत होती. ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेऊन दोन महिन्यानंतर सोन्याचे दराने ५५ हजार ५०० चा पल्ला गाठला होता. त्यामुळे त्या वाढलेला दराचाही परिणाम सराफा बाजारावर झाला होता. मात्र, त्यानंतर कमी जास्त प्रमाणात हजार ते तीन हजार रुपयांची सोन्याच्या दरात चढ-उतार सुरु होता. त्यामुळे ज्यांना सोने पाहिजे, त्यांच्याकडून कमी जास्त प्रमाणात खरेदी करण्यात येत होती. चढ्या दराचा परिणाम सोन्यावर दिसून आला. लग्न सराईत सोन्याला चांगली मागणी असल्याने दरात फारशी घट झाली नाही. मात्र, आता लग्न सराई नसल्याने सोन्याचे दर कमी झाले तरी, सोन्याला फारशी मागणी नसल्याचे चित्र सराफा बाजारात दिसून येत आहे.

मागणी नसली तरी, चालेल दुकान बंद नको व्हायला
आता सोन्याचे दर कमी झाले तरी, सध्या लग्नसराई नसल्याने तसेच धार्मिक अन्य सांस्कृतिक कार्यक्रम कमी असल्याने सोन्याला मागणी नसल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे कोरोना वाढत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये सरकार काय करेल, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे दर काही असला, ग्राहक मिळत नसले तरीही चालेल मात्र, दुकाने बंद व्हायला नकोत, अशी भावना व्यापाऱ्यांनी ‘दिव्य मराठी’कडे बोलून दाखवली.

चांदीच्या दरातही घसरण, ६३ हजार ५०० रुपये किलो
गेल्या अनेक दिवसांपासून चांदीला चांगली चकाकी मिळत आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी चांदीचे दर ६४ हजार ५०० ते ६५ हजाराच्या जवळपास गेले होते. मात्र, सोन्याचे दर कमी होण्यासह चांदीच्या दरातही एक हजार रुपयांची घसरण झाली आहे. आता चांदी ६३ हजार ५०० रुपये किलाे या प्रमाणे मिळत आहेत.

सोने-चांदीच्या दरात ८ महिन्यांनंतर मोठी घसरण
सोन्या आणि चांदीच्या दरात आठ महिन्यानंतर ही मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचा दर कमी झाला आहे. त्याच बरोबर लग्नसराई संपल्यातच जमा असल्याने दर कमी झाले आहेत. दर कमी जास्त झाले तरी चालतील मात्र, दुकाने बंद करण्याचा निर्णय नको व्हायला.
-संजय गणेश, सराफा व्यापारी.

बातम्या आणखी आहेत...