आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सादरीकरण:तुळजाभवानीचे सोने-चांदीचे सिंहासन, सजावटीसाठी 15  दिवसांत प्रस्ताव

उस्मानाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आई तुळजाभवानीचे सोने-चांदीचे सिंहासन करण्यात येणार आहे. तसेच भिंतीवर चांदीचे मखर व सजावटही करण्यात येणार. या कामांसाठी आवश्यक प्रस्ताव १५ दिवसांत सादर करण्यात येणार आहे.विश्वस्त मंडळाच्या बैठकीत मान्यता घेत हे काम लवकरच पूर्ण करणार आहे. मंदिर राज्य संरक्षित स्मारक असून या विषयांसंदर्भात पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अनिवार्य बदल करुनच ही कामे करावी लागणार आहे. आई तुळजाभवानी मंदिर देवस्थान विकास तसेच तुळजापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रालयात बैठक झाली. यात प्राथमिक विकास आराखड्याचे सादरीकरण केले.

यात अद्यावत सोयी सुविधा, पर्यटन, वाहतूक व्यवस्था व इतरही महत्त्वाच्या विकास कामांकडे लक्ष वेधण्यात आल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. तुळजापूर शहर व मंदिर विकासाच्या अनुषंगाने आराखडा करण्यासाठी तज्ञ सल्लागार समिती नियुक्त केली. या समितीने मंत्रालयात प्राथमिक सादरीकरण केले. यातील प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चा करून कालबद्ध नियोजनासाठी आवश्यक निर्णय घेण्यात आले आहेत. तुळजापूर शहरातून जात असलेले औरंगाबाद- सोलापूर व गोवा - नागपूर सह प्रस्तावित सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग तसेच प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे आगामी काळात भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे.

त्यामुळे विकास आराखडा तयार करताना पुढील ५० वर्षांचा विचार करून नियोजन केले जाणार आहे. जगभरातून येणारे भाविक शहरात किमान ३ दिवस राहतील, अशा पायाभूत सुविधांचा तसेच पर्यटन आकर्षणाचा नियोजनबद्ध विकास केल्यास आर्थिक समृद्धीस मोठा हातभार लागू शकतो. हे लक्षात घेऊन या मुद्द्यावर दीर्घ चर्चा झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, सल्लागार चेतन रायकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांची उपस्थिती होती.

भाविकांना कमी वेळेत दर्शनाचा लाभ
भाविकांच्या दर्शनास कमीत कमी वेळ लागेल असे व्यवस्थापन आणि त्यासाठी अद्ययावत साधनसामग्रीचा अंतर्भाव असलेली यंत्रणा उभी करण्यात येणार आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. शहर वाहतूक सुविधेत बदल करून सुसूत्रता आणणे, हॉटेल, आस्थापना, व्यापार यांची भरभराट करण्यावर बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

अनुभवी तज्ञांचे आराखडा तयार करण्यास सहकार्य
समृद्धी महामार्ग, नांदेडच्या गुरुद्वारा विकास आराखड्यात भूमिका बजावलेले तज्ज्ञ राधेश्याम मोपलवार हे तुळजारपूरचा आराखडा तयार करण्यासाठी सहकार्य करीत आहेत. त्यांच्याच उपस्थितीत तुळजापूरचे सादरीकरण झाले आहे. यामुळे शहर व देवस्थान विकासाच्या कामांना गती मिळणार असल्याची अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...