आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पळवाट:शासकीय कार्यालयांत बायोमेट्रिक नाही,‎ कर्मचारी येतात उशिरा, कामे खोळंबली

आबासाहेब बोराडे | भूम‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील शासकीय कार्यालयात‎ बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित नसल्याने‎ अनेक कर्मचारी उशिरा येत असल्याचे‎ दिसून येत आहे. हजेरी नोंदवहीवर सही‎ करून कर्मचारी निघून जाऊ नये, यासाठी‎ शासनाने सकाळी व सायंकाळी‎ बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली आहे.‎ मात्र, भूम तालुक्यातील एकाही शासकीय‎ कार्यालयात बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित‎ नसल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फावत‎ आहे.‎

कोरोना काळात संसर्गाच्या धोक्याच्या‎ पार्श्वभूमीवर प्रशासनाने कर्मचारी व‎ अधिकाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी बंद केली‎ होती. त्याऐवजी संबंधित विभागातील‎ वहीमध्ये स्वाक्षरी करुन उपस्थिती लावली‎ जात होती. परंतु आता कोरोनाची साथ‎ ओसरल्यावर र बायोमेट्रिक हजेरी यंत्रणा‎ कार्यान्वित करणे गरजेचे आहे.

परंतु‎ शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये स्वाक्षरी‎ करुन नोंदीलाच प्राधान्य दिले जात‎ असल्याचे निदर्शनास येत आहे. पाच‎ दिवसांच्या आठवड्याचा निर्णय घेतल्याने‎ अधिकारी व कर्मचारी खुश आहेत. मात्र,‎ नागरिक या निर्णयावर समाधानी नाहीत.‎ अधिकारी व कर्मचाऱ्यांना नवीन कार्यालयीन‎ वेळा देण्यात आल्या आहेत. सकाळी ९.४५‎ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत कार्यालयाचे‎ कामकाज करण्याचे आदेश आहेत.‎

मात्र, कर्मचारी वेळेत येतात की नाही, हे‎ पाहण्यासाठी बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित‎ असणे आवश्यक आहे. ही यंत्रणा‎ नसल्याने अधिकारी व कर्मचारी केव्हा‎ येतात व कधी जातात, हे समजतच नाही.‎ बऱ्याच वेळा अधिकारी व कर्मचारी‎ कार्यालयात हजर नसतात. केवळ‎ नोंदवहीत हजेरी लावून निघून जात‎ असल्याची नागरिकांची तक्रार आहे. काही‎ कर्मचारी तर दोन दिवसानंतर येऊन‎ नोंदवहीत सही करतात, असेही समजते.‎

यावर नियंत्रणासाठी कार्यालयाच्या प्रमुख‎ प्रवेशद्वारावर बायोमेट्रिक यंत्रणा बसवणे‎ अत्यावश्यक आहे. या यंत्रणेवर कोणता‎ कर्मचारी किती वाजता आला व गेला याची‎ ऑनलाइन नोंद होते. त्यानुसारच त्यांचा‎ पगार काढल्यास शासनाचे देखील आर्थिक‎ नुकसान टळणार आहे. नुसती‎ बायोमेट्रीकवर हजेरी लाऊन उपयोग नाही‎ तर बायोमेट्रिक वरील नोंदीनुसारच पगार‎ निघण्याची व्यवस्था शासनाने राबवावी.‎ शासनाने प्रत्येक शासकीय कार्यालयाला‎ बायोमेट्रिक यंत्रणा बसवण्याच्या आदेश‎ देऊनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.‎

‘त्या’ हजेरीवरुनच पगार काढा‎
नागरिकांची कामे होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी‎ कार्यालयात वेळेत उपस्थित राहणे गरजेचे‎ आहे. यासाठी बायोमेट्रिक यंत्रणा बसवणे‎ आवश्यक आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांचा‎ पगार बायोमेट्रिक हजेरीवरुनच काढला जावा.‎ बाळासाहेब क्षीरसागर, भाजप नेते, भूम.‎

यंत्रणा कार्यान्वयनाची सूचना देणार‎

शासकीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा‎ कार्यान्वित असणे गरजेचे आहे. ज्या कार्यालयांनी‎ यंत्रणा बसवली नाही किंवा यंत्रणेत बिघाड झाला‎ आहे, त्यांनी तत्काळ यंत्रणा बसवावी कार्यान्वित‎ करुन घ्यावी, याबाबत सूचना देणार आहे. -‎ रोहिणी नऱ्हे, उपविभागीय अधिकारी, भूम.‎

... तर कर्मचाऱ्यांनाही लागणार‎ शिस्त, कामांना येणार वेग‎
शासकीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक‎ यंत्रणा बसवण्याबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष‎ केलेत जात आहे. बायोमेट्रिक हजेरी लावा‎ अन्यथा पगार बंद करा, अशा आदेश‎ शासनाने काढला पाहिजे. बायोमेट्रीकमुळे‎ लेट लतीफ कर्मचाऱ्यांना शीस्त लागेल.‎ प्रभाकर गाढवे, नागरिक, भूम.‎

कर्मचारी वेळेत आली तर नागरिकांची कामे झपाट्याने होतील‎
भूम तालुक्यात उपविभागीय अधिकारी‎ कार्यालय, उपविभागीय पोलिस अधीक्षक‎ कार्यालय, सार्वजनिक बांधकाम,‎ वनपरिक्षेत्र कार्यालय, तहसील कार्यालय,‎ जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यालय,‎ पंचायत समिती, गटशिक्षण अधिकारी‎ कार्यालय, तालुका कृषी कार्यालय,‎ पशुवैद्यकीय दवाखाना, प्राथमिक आरोग्य‎ केंद्र यासह अनेक इतरही कार्यालयांमध्ये‎ नवीन कार्यालयीन वेळेनुसार क्वचितच‎ एखादा अधिकारी निर्धारीत वेळेत हजार‎ झालेला पहायला मिळत आहे. अधिकारी‎ वेळेत हजर झाले तर इतरही कर्मचारी वेळेत‎ कार्यालयात येतील. नागरिकांची कामेही‎ झपाट्याने होतील. यासाठी बायोमेट्रीक‎ बसवणे आवश्यक आहे.‎

बातम्या आणखी आहेत...