आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरीप हंगाम:सरकारने शेतकऱ्यांचा अंत बघू नये ; आमदार कैलास पाटील यांचा इशारा

उस्मानाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चालु खरीप हंगामात गोगलगाय व सततच्या पावसामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त झाले. राहिलेले पीक यलो मोझॅक (हळद्या) रोगाने बाधित झाले. शेतकऱ्यांची आता फक्त सरकारवर आशा आहे. त्यामुळे भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असा इशारा आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी दिला आहे. कोल्हापूर-सांगली भागात दिलेल्या मदतीच्या धर्तीवरच उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत द्यावी. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात २ वर्षांचे पीककर्ज माफ केले. एसडीआरएफचे निकष बाजुला ठेवून मदत देण्यात आली. उस्मानाबादला देण्याची मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. जिल्ह्यात काही दिवसांपासून संततधार पावसामुळे पेरणी केलेले बियाणे उगवलेच नाही.

शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. तेव्हाच नुकसानीचे पंचनामे करण्याची गरज होती. परंतु कृषी व महसूल विभागाला शासनाकडून आदेश आले नसल्याने त्यांनी वेळेत पंचनामे केले नाहीत. मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही राज्य शासनानेच पंचनामे करण्याचे आदेश दिले नव्हते. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची प्रक्रियाच सरकारने थांबवली, हे संतापजनक आहे, असे आमदार कैलास पाटील म्हणाले. पंचनाम्यांचे आदेश येईपर्यंत नुकसानीचे प्रमाण वाढत गेले. प्रारंभी उगवलेले सोयाबीन गोगलगायी व किडींमुळे वाया गेले. न उगवलेल्या पिकाच्या नुकसानीची मदत पीकविमा योजनेतून मिळत नाही. त्यात आता अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे पीकच वाहून गेले. राहिलेल्या पिकावर यलो मोझॅकचा हल्ला झाला.

शेतकऱ्यांनी पीककर्ज घेऊन हा खर्च केला आहे. त्यात गेल्या दोन वर्षात नुकसान होऊनही पीकविमा मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मागील दोन वर्षातील व चालु वर्षाचे पीककर्ज माफ करणे आवश्यक आहे. अन्यथा कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची भीती आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केली. कोल्हापूर व सांगलीत कोरडवाहू पिकांना २० हजार ४०० तर बागायती पिकांना ४० हजार ५०० व बहुवार्षिक पिकांना ५४ हजार रुपये मदत केली होती. तशीच परिस्थिती आता उस्मानाबाद जिल्ह्यात उद्भवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करुन पंचनाम्यांचा अडसरही न पाळता थेट मदत करावी, अशी अपेक्षा कैलास पाटील यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...