आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्रोश:सरकार, तुम्हाला किती श्रद्धांचे तुकडे हवेत, लव्ह जिहाद विरोधी कायद्याला उशीर का; महिलांच्या शिष्टमंडळाने दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सरकार, तुम्हाला आणखी किती श्रद्धांचे तुकडे हवेत, लव्ह जिहाद विरोधी कायद्याला उशीर कशासाठी? असे फलक घेऊन येथे मंगळवारी सकल हिंदू समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. तब्बल तीन तास शहरात फिरल्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत महिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात मागण्यांचे निवेदन सादर केले.

लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा करावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने माेर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात राजमाता जिजाऊ चौकातून करण्यात आली. सुरुवातीला राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे महिला व मुलींच्या हस्ते पूजन करण्यात आले.

यावेळी वर्षा जेवळे यांनी मोर्चाचा उद्देश व लव्ह जिहाद, धर्मांतरासंदर्भात माहिती सांगितली. राष्ट्रमाता जिजाऊ चौकातून निघालेला हा मोर्चा शहरातील बार्शी नाका, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, टपाल कार्यालय, काळा मारुती मंदिर, नेहरु चौक, देशपांडे स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक प्रमुख मार्गावरून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला.

लव्ह जिहाद करणाऱ्यांना फाशी द्या
श्रद्धा वालकरच्या निर्घृण हत्येनंतरही आणखी किती हिंदू युवतींचे बळी गेल्यानंतर शासन ‘लव्ह जिहाद’विरोधात कायदा करणार? लव्ह जिहाद करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या. देशात ९ राज्यांत हा कायदा लागू केला आहे, महाराष्ट्रातही हा कायदा लवकर लागू करा. हिंदू संस्कृती व स्वभाषेचा अभिमान नसल्याने हिंदू युवती ‘लव्ह जिहाद’ला बळी पडताहेत. हिंदूंनी पुढील पिढीला हिंदू संस्कृतीचे महत्त्व शिकवावे, असे आवाहन सनातन संस्थेच्या वर्षा जेवळे यांनी केले.

संघटनांच्या वतीने अनेक ठिकाणी पाण्यासह खाद्यपदार्थाचे वाटप
मोर्चाच्या संयोजकांच्या वतीने तीन ठिकाणी पाणी वितरणाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, काही सामाजिक मंडळ, नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने अनेक ठिकाणी पाण्याच्या बाटल्या वाटल्या. तसेच अनेक ठिकाणी बिस्किट पुडे, खाद्यपदार्थही नागरिकांनी दिले. दरम्यान, मोर्चा पुढे गेल्यावर तेथेच खाद्य पदार्थांची पाकिटे व रिकाम्या बाटल्या पडलेल्या होत्या. याची माहिती मिळाल्यावर स्वयंसेवकांनी तातडीने स्वच्छता केली.

सुरुवातीला मूकमोर्चा, पुन्हा घोषणाबाजीला सुरुवात
सुरुवातीला मूकमोर्चाचे नियोजन होते. त्यानुसार जिजाऊ चौकातून मूकमोर्चा काढण्यात आला. मात्र, नेहरू चौकात मोर्चा आल्यावर घोषणाबाजी सुरू झाली. यामुळे पोलिसांनाही प्रश्न पडला अचानक मूकमोर्चाचे रुपांतर घोषणाबाजीत कसे झाले, दरम्यान, तुळजापूरहून आठ वाहनातून आलेले नागरिक नेहरू चौकातून सहभागी झाले. तेव्हापासूनच घोषणाबाजीला सुरुवात झाली.

बातम्या आणखी आहेत...