आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचालित लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाने मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून मंगळवारी ग्रंथ दिंडीचे आयोजन केले होते. दिंडीतून मराठी भाषेचे संवर्धन आणि जतन करून शांततेचा आणि समतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या ग्रंथदिंडीमध्ये तुकोबांची गाथा, महात्मा फुले समग्र वांगमय, भारताचे संविधान, भगवतगीता, ज्ञानेश्वरी, रामायण, कुराण इत्यादी पवित्र ग्रंथाची दिंडी हरी नामाच्या गजरात काढण्यात आली. महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आयुब शेख, माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, कमलाकर शिरसाट, सय्यद पाशा पटवारी, शरीफ हेड्डे यांच्या हस्ते पूजन करून उद्घाटन करून दिंडीला सुरुवात करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेषभूषा धारण केली होती. मुलींनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ वेशभूषेतून साकारल्या तर विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाचा पेहराव परिधान केला होता. या ग्रंथ दिंडीला शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरुवात करून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बसस्थानक व परत त्याच मार्गे येऊन महाविद्यालयामध्ये सांगता करण्यात आली. या प्रसंगी शहरातील विविध मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्राध्यापकांची फुगडी
छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ग्रंथ दिंडीचे आगमन झाल्यानंतर विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी विविध अभंग, गवळणी म्हणत आणि वारकरी संप्रदायातील फुगडी हा कलाप्रकार सादर केला. या फुगडीने सर्वांचेच लक्ष वेधले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.