आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समृद्धीची गुढी:निराशेचे मळभ हटले, गुढीपाडव्याला 500 तोळे सोने, 400 दुचाकींची विक्री; एकाच दिवसात सुमारे 15 कोटींची उलाढाल

उस्मानाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अपेक्षेप्रमाणे यावर्षी गुढीपाडव्याला बाजारपेठेतही चांगला उत्साह जाणवला. याच्या मुहूर्तावर शहरात तब्बल ५०० तोळे सोने, विविध शो रुम्समधून ४०० पेक्षा अधिक दुचाकींची विक्री एकाच दिवसात झाली. यासोबतच कापड, रियल इस्टेट, इलेक्ट्रॉनिक आदी क्षेत्रातही अपेक्षेपेक्षा अधिक उलाढाल झाली. एकाच दिवसात १४ ते १५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज असून कडक उन्हामुळे सकाळी व सायंकाळी तसेच रात्री उशिरापर्यंत ग्राहकांची रेलचेल होती.

कोरोनाच्या प्रभावामुळे गेल्या दोन गुढीपाडव्याच्या दिवशी बाजारपेठेत शुकशुकाट होता. अत्यंत निराशेचे दिवस जिल्ह्यातील नागरिकांना पहावे लागले होते. अंगावर काटा आणणारे अनुभव त्यांना आले. मात्र, यावर्षी कोरोनाचे मळभ हटल्यामुळे बाजारापेठेत चैतन्याचे वातावरण जाणवत होते. शनिवारी गुढीपाडव्याला मोठी उष्णता होती. दुपारी तर बाहेर पडणेच अशक्य होते. यामुळे सकाळी व सायंकाळच्या दरम्यान दुकाने गजबजलेली दिसत होती. गुढीपाडव्याला साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त यादिवशी सोने व नवीन वस्तू खरेदी केली जाते. यामुळे बाजारात गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत मोठी झालेली दिसून आली. एकट्या उस्मानाबाद शहरात १०० पेक्षा अधिक सराफा - सुवर्णकारांची दुकाने आहेत. सराफा सुवर्णकार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष संजय गणेश, विष्णूदास सारडा तसेच सुवर्ण शोरूम्सचे प्रमुख ऋषिकेश ओमासे यांनी यावेळी गतवर्षीपेक्षा अधिक दागिण्यांची विकी झाल्याचे सांगितले.

गेल्या आठवड्यापासूनच अनेकांनी दागिण्यांच्या विविध डिझाईनच्या ऑर्डर दिल्या होत्या. त्यानुसार गुढीपाडव्याला प्रत्यक्ष खरेदी करण्यात आली. शहरात सुमारे ५०० तोळे सोन्याचे दागिने विक्री झाल्याचा अंदाज आहे. यातून तब्बल दोन ते अडिच कोटींची उलाढाल झाली. पुढे विविध कारणांमुळे सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता असल्यामुळे अनेकांनी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला. विविध दुचाकींचा बाजारही यावेळी चांगलाच बहरलेला दिसला बुकिंग व प्रत्यक्ष विक्रीचा एकत्रित टाळेबंद पाहिला तर तब्बल ४०० ते ४५० दुचाकींची विक्री झाल्याचे दिसून आले. यामध्ये स्कुटर, इलेक्ट्रॉनिक दुचाकींचाही समावेश आहे. यावेळी दर वाढलेले असताना तसेच पेट्रोलचेही भाव वाढलेले असतानाही दुचाकी खरेदीसाठी उत्साह जाणवत होता.

उत्स्फूर्त प्रतिसाद, कसर भरून निघाली
यावेळी गेल्या दोन वर्षाच्या गुढीपाडव्याची कसर भरून निघाली. ग्राहकांचा अपेक्षेपेक्षा अधिक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी आकर्षक डिझाइनचे नवीन पद्धतीचे दागिने उपलब्ध करण्यात आले होते. ऋषीकेश ओमासे, सुवर्णकार, उस्मानाबाद.
सकरात्मक वातावरण, घरांची बुकिंग जोरात
जिल्ह्यात सध्या सकारात्मक वातावरण आहे. पाऊस चांगला झाला असून शेतकऱ्यांचे उत्पादन चांगले निघाले. यामुळे नवीन घर घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असल्याचे दिसून आले. अनेकांनी घरांची बुकिंग केली आहे. संदीप बागल, विकासक.

कापड व्यवसायात तीन कोटी रुपयांची उलाढाल
गुढीपाडव्याच्या खरेदीसह अनेकांनी विवाह बस्त्याचाही मुहूर्त साधला. शहरात १३० कापड दुकाने असून यातून सुमारे ३ कोटींची उलाढाल झाली. कापड शोरुम्सचे प्रमुख प्रशांत कठारे, दुकानदार हर्षद चाकवते यांच्यानुसार दोन वर्षांच्या तुलनेत विक्रमी विक्री झाली.

अन्य वस्तूंच्या दुकानातही गर्दी
अन्य वस्तूंच्या दुकानातही मोठी गर्दी दिसत होती. नागरिक इलेक्ट्रॉनिक वस्तुंचीही मोठी खरेदी करत होते. यामध्ये उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर कुलर, फॅन, वाताणूकीत यंत्राची विक्री झाली. तसेच टीव्ही, मोबाईलचीही मोठ्याप्रमाणात खरेदी झाली. यासोबतच स्टीलची भांडी, सौंदर्य प्रसाधने, इलिमेटेशन ज्वेलरी आदींचाही बाजार बहरला होता. यामध्ये ३ ते ४ कोटी उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.

नवीन घराचे स्वप्न होणार पूर्ण
रियल इस्टेट व्यवसायिकांनी विविध प्रकारच्या आकर्षक स्किम तयार केल्या आहेत. शहरात विकसकांच्या ८ मोठ्या योजना विविध ठिकाणी सुरू आहेत. येथे विचारणा करण्यासाठी व प्रत्यक्ष बुकिंगसाठी मोठी गर्दी झाली होती. काहींनी गुंतवणूक म्हणून तर अनेकांनी नवीन घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नोंदणी केली. नोंदणी व भेटीवरून सुमारे तीन कोटींची उलाढाल झाल्याचे यामध्ये दिसून आले.

बातम्या आणखी आहेत...