आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवर्धन:वन्यप्राण्यांचा अधिवास धोक्यात, रामपूर शाळेत विद्यार्थ्यांचे प्रबोधन ; निसर्ग जतनाबाबत जागृती

उमरगा8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील रामपूर जिल्हा परिषद प्रा. शाळेत सहशालेय उपक्रमांतर्गत शनिवारी (दि.१९) विद्यार्थ्यांना वाइल्ड लाइफ क्लबच्या वतीने क्लबचे संचालक सचिन चिंचोळे यांच्या वतीने जंगली प्राण्यांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्ष गंुडू महाराज भोसले होते. मुख्याध्यापक धोंडिराम चव्हाण, बालाजी गायकवाड, स्नेहा वेल्हाळ, प्रदीप मदने यावेळी उपस्थित होते. क्लबचे संचालक चिंचोळे म्हणाले की, वाढती लोकसंख्या आणि सातत्याने होणाऱ्या वृक्षतोडीमुळे वन्यप्राण्यांचा अधिवास हिरावला जात आहे. वनक्षेत्रावर मानवांचे वाढते अतिक्रमण, दुष्काळसदृश्य परिस्थितीत पाण्याअभावी सुकलेली झाडे, यामुळे वन्यप्राणी नामशेष होत आहेत. मानवी गरजा भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे.

जंगले ओसाड होत चालली आहेत. गौण खनिज माती, मुरूम व डबर आदीच्या उत्खननामुळे जंगलाचा ऱ्हास होत चालला आहे. डोंगर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सरपणासह इतर व्यावसायिक कारणांसाठी वनक्षेत्रात वृक्षांची बेसुमार कत्तल होत असून वन्यप्राण्यांचे जीवन धोक्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आतापासूनच निसर्गाचे जतन व संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना विविध प्राण्यांच्या चार्टचे वाटप करण्यात आले. विद्यार्थी व पालकांनी वन्यजीव संगोपनाची शपथ घेतली. शिक्षक सी. व्ही. कांबळे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

प्राण्यांची अन्नासाठी भटकंती जंगली प्राण्यांची हत्या, वाढती लोकसंख्या व शहरे डोंगर सपाटीकरण, वृक्ष व जंगल तोड यामुळे जंगली प्राण्यांना अन्न-पाणी शोधासाठी भटकंती करावी लागत आहे. प्राण्यांची शिकारही केली जात आहे. हरिण, वाघ, सिंह, काळवीट आणि हत्ती हे प्राणी कमी होत आहेत. आता वन्यप्राणी केवळ पुस्तकात पाहायला मिळत आहेत. यासाठी वृक्ष लागवड, संगोपन व पर्यावरण जोपासायला हवे. जंगली प्राणी सुरक्षा म्हणून शिकारीवर शासनाने कडक कायदा करुन बंदी घातली. आपण सर्वजन मिळून जंगली प्राणी वाचवले पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...