आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:प्रशासनातील वर्दीसाठी मेहनतीस पर्याय नाही; जिल्हाधिकारी दिवेगावकर यांचे मत, डिकसळ येथे टॅलेंट हंट शिबिरात मार्गदर्शन

डिकसळ10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असल्यास विद्यार्थ्यांनी परिस्थितीचे कारण पुढे न करता प्रमाणिकपणे अभ्यास करावा.परिस्थितीशी दोन हात करायला शिकतो तोच जीवनातील स्पर्धा जिंकतो. प्रशासनातील वर्दी मिळवण्यासाठी मेहनतीला पर्याय नाही,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी शुक्रवारी (दि. ६) डिकसळ येथील शिक्षणमहर्षीं ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात सुरु असलेल्या रुलर टॅलेंट हंट शिबिरात मार्गदर्शनप्रसंगी केले.

गेल्या पाच दिवसांपासून मोहेकर महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलात ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सहाय्यक पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या संकल्पनेतून मार्गदर्शन केले जात आहे. या शिबिराला तालुक्यातील युवक युवतींचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जिल्हाधिकारी दिवेगावकर म्हणाले, परिस्थिती कशीही असो, मेहनत करायला शिका.गल्ली बोळातील दादा तुम्हाला कधीच सन्मान प्राप्त करून देणार नाही. किंवा चित्रपटातील हिरो कधीच आपले आदर्श असू शकत नाहीत. जीवनात प्रत्येक टप्प्यावर प्रचंड स्पर्धा आहे. एक स्पर्धा जिंकलात तर दुसरी हारु शकता. त्यामुळे नेहमी आपण स्पर्धेला तोंड देण्यासाठी तयार असले पाहिजे.

गाढव मेहनत करण्यापेक्षा स्मार्ट वर्क करायला शिका. आपल्याला प्रशासकीय सेवेत यायचे असेल तर स्पर्धा परीक्षेशिवाय दुसरा मार्ग नाही. त्यासाठी लवकर तयारीला सुरुवात करा. स्कॉलरशिप व पाचवी ते बारावीपर्यंतची सगळी क्रमिक पुस्तके अभ्यासा. जास्तीजास्त वाचनाची सवय लावा. तुम्हाला कोणत्याही टप्प्यावर मार्गदर्शन हवे असल्यास माझ्या कॅबिनचे दरवाजे खुले आहेत. यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक एम. रमेश, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. अशोकराव मोहेकर, प्राचार्य डॉ. सुनील पवार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, गजानन पुजरवाड, अरविंद शिंदे आदींसह विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन प्रा.जगदीश गवळी यांनी केले.

मोबाइल हाच गुरू
अनेकांना वाटते आपण चांगला कोचिंग क्लास लावला पाहिजे. पण तुमच्या हातात असलेला मोबाइल हाच मोठा तुमचा गुरू आहे. अवघड जाणारे प्रत्येक विषय युट्युबवर समजावून सांगितलेले आहेत. अनेकांच्या प्रेरणादायी मुलाखती तिथे पहायला मिळतील. युट्यूबचा वापर अभ्यासासाठी करा, असा सल्ला देत जिल्हाधिकारी दिवेगावकर म्हणाले,स्पर्धा परीक्षेत नशीब अजमावणारे अनेक युवक अपयशानंतर निराश होतात. मात्र या जीवघेण्या स्पर्धेत टिकायचे असेल तर आपल्याकडे प्लॅन बी सुध्दा तयार असला पाहिजे. त्यासाठी छोटेमोठे कौशल्याधिष्टित कोर्स पूर्ण करा. पोटा-पाण्याचा प्रश्न देखील आपल्याला सोडवता आला पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...