आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:करदात्यांना जास्तीचा कर लागल्याच्या तक्रारीवर सुनावणी ; कोरोनामुळे सुनावणी अडली हाेती

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नगर पालिकेकडून शहरातील मालमत्तांची मोजणी करुन नागरिकांना कर लावण्यात आला होता. मात्र, यात अनेकांनी कर चुकीचा लागला असल्याची तक्रार केली होती. कोरोना पासून अद्याप त्यावर तोडगा काढला नव्हता. आता मात्र, संबंधीत कर दात्यांना नोटिस पाठवून मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसात त्यांची सुनावणी घेण्यात आली. यात सर्वांचे म्हणणे एकूण घेतले. त्यांचा निपटारा लवकरच करुन नागरिकांना दिलासा देणारा निर्णय समितीकडून घेण्यात येणार असल्याचे समोर आले.

शहरातील मालमत्तांना कर लावण्यात आला आहे. २४ हजार पेक्षा जास्त निवासी आणि व्यावसायीक मालमत्ता शहरात आहेत. यापैकी अनेकांनी चुकीचा कर लागल्याची तक्रार नगर परिषदेला केली होती. त्यांची संख्या १६५ इतकी होती. मात्र, कोरोनातील दोन वर्षांमध्ये त्यांच्या तक्रारीवर सुनावणी होऊ शकली नाही. तसेच मध्यंतरी निवडणुकांची कामे सुरु झाल्यानेही सुनावणी लांबणीवर पडली होती. त्यामुळे आता दिवाळी सण झाल्यावर नगर परिषदेने सुनावणी घेणार असल्याची तारीख संबंधीत कर धारकांना कळवली होती. त्यानुसार सकाळी नऊ ते एक या काळात दोन दिवस कर अपील समिती समोर कर दात्यांची सुनावणी घेण्यात आली.

यात दोन दिवसात ११० जणांची सुनावणी समिती समोर पाडली. त्यांचे म्हणणे एकूण घेत त्यांचे दस्ताऐवजीही जमा करुन घेतले. आगामी काळात त्यावर समितीकडून निर्णय घेण्यात येणार आहे. समितीमध्ये मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे, नगररचना विभागाचे सहायक संचालक नारायण कुलकर्णी, नायब तहसीलदार कळुसे, कार्यालयीन अधीक्षक संजय कुलकर्णी, प्रदीप मोटे, संज्योत सावंत, भारत साळुंके यांचा समावेश आहे.

५५ जणांची सुनावणी १७ नोव्हेंबर रोजी
नगर परिषदेकडून सुनावणी होत असताना ५५ जणांनी त्यांच्या वैयक्तीक अडचणी असल्याने दोन दिवसात येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यांची सुनावणी १७ नोव्हेंबर रोजी होईल.

समितीकडून चांगला निर्णय होईल
महाराष्ट्र अधिनियम नगर पालिका, नगरपंचायत १९६५ च्या कलमानुसार कर अपील समितीसमोर सुनावणी घेण्यात आली. त्यांचे एकूण घेत पुन्हा त्यांची मोजणी करुन कर निर्धारण करण्यात येईल. कर दात्यांच्या अडचणी सोडवून नागरिकांना पुरक असे निर्णय घेण्यात येईल.
हरिकल्याण येलगट्टे, मुख्याधिकारी.

बातम्या आणखी आहेत...