आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अवकाळी वादळी पावसाने चांगलेच थैमान घातले. अनेक ठिकाणी गारा पडल्या असून, उस्मानाबाद तालुक्यातील रुई येथे वीज पडून महिला दगावली. तसेच दुधगाव येथे वीज पडूनच मोठे नुकसान झाले.
उस्मानाबाद तालुक्यातील रुई(ढोकी) येथे शुक्रवारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वीज पडल्याने पस्तीस वर्षीय महिला दगावली. येथील वैष्णवी देवेंद्र घुटे (३५) या शेतात गेल्या असता सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह रिमझिम पाऊसास सुरुवात झाली. यात शेतात काम करत असलेल्या वैष्णवी घुटे यांच्यापासून काही अंतरावर वीज पडल्याने त्या बेशुद्ध पडल्या. त्यांना तातडीने उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषीत करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सासू, सासरे असा परिवार आहे. उस्मानाबाद तालुक्यातील दुधगाव येथेही वादळी वाऱ्याचा कहर बरसला. येथील सुग्रीस कसबे यांच्या घरावर वीज पडली. यामध्ये त्यांचे पत्र्याच्या छताचे नुकसान झाले. तसेच झाडू तयार करण्याच्या साहित्यानेही चांगला पेट घेतला. कुटुंबीय आतील खोलीत असल्यामुळे सुदैवाने जिवित हाणी झाली नाही. मात्र, कसबे यांचे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले.
उस्मानाबाद शहरातही सातत्याने अधून-मधून पाऊस सुरू होता. कळंब तालुक्यातील येरमाळा परिसरात अवकाळी पाऊस झाला. मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी लगबग करून शेतातील कामे सुरू केले. शुक्रवारीही सकाळपासून तालुक्यातील विविध ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतामध्ये ठेवलेले धान्य झाकून ठेवले. संध्याकाळच्या वेळा कळंब परिसरात थोडा अवकाळी पाऊस झाला. मात्र, येरमाळा परिसरात जास्त प्रमाणात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे. उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथेही सायंकाळी पाचच्या सुमारास २० मिनिट पाऊस झाला. ज्वारी कापणी सुरुवात आहे. पावसामुळे ज्वारी काळी पडू शकते. आंब्याचा मोहर गळून पडला आहे. यामुळे अंब्याचे उत्पादन घटणार आहे.
हातातोंडाशी आलेला घास हिरावला
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी परिसरात शुक्रवारी सातच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्ष बागायतदारांना बसला. सध्या ज्वारीची काढणी सुरु आहे. तर काही ठिकाणी ज्वारीची रास खळ्यावरच असल्यामुळे ज्वारी भिजून नुकसान झाले. माळुंब्रा येथील ३३ केव्ही उपकेंद्रातून सात वाजल्यापासून विद्युत पुरवठा खंडीत केल्याने नागरिक हैराण झाले.
म्हैस ठार, शेतकरी जखमी
उस्मानाबाद तालुक्यातील आळणी परिसरात १५ मिनिटे गोटीच्या आकाराच्या गारा पडल्या. यामुळे आंब्याचा मोहोर गळून पडला. अंकुश उत्तम तांबे यांची म्हैस वीज पडून ठार झाली. तर तांबे जखमी झाल्याने त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.