आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा"कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाला, सरकारनेच योजना सुरू केल्यामुळे ५०हजार सानुग्रहअनुदानासाठी एकावर्षापूर्वीचऑनलाइन अर्जकेला. परंतु,तेव्हापासूनजिल्हाधिकारी कार्यालयात फेऱ्या मारत आहे. अद्याप अनुदान मिळाले नाही. कोणी याची माहितीही देत नाही'' शासनाकडूनच आमची क्रुर थट्टा सुरू आहे, अशी व्यथा मांडताना कमल सदाशिव राजमाने (७०, रा. नांदुरी, ता. तुळजापूर) यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले. कोरोनात मृत्यू झालेल्यांचे अनेक वारसदार सानुग्रह अनुदानासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. राज्य सरकारने कोरोना काळात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची योजना नोव्हेंबर २०२१ मध्ये सुरू केली.
मात्र, याेजनेचा हेतू १५ महिन्यांनंतरही साध्य झाला नाही. नांदुरीच्या कमल राजमाने यांच्या पतीचा कोरोनात मृत्यू झाला. त्यांनी ५० हजारांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची पूर्ण प्रक्रिया केली. अर्ज करून वर्ष होत आले तरीही त्यांना अनुदान मिळाले नाही. त्यांना सातत्याने जिल्हाधिकारी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठपुरावा करावा लागत आहे. विभागानेही सर्व प्रक्रिया पूर्ण केली, त्यांचे कागदपत्र पुन्हा पाठवण्यात आले. राजमाने यांच्याप्रमाणे सुमारे एक हजार लाभार्थींचे कागदपत्र पुन्हा पाठवण्यात आले. परंतु, त्यांना अनुदान मिळाले नाही. कोरोनाने घरातील प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर झालेल्या वेदनांपेक्षा राज्य सरकारकडून होणाऱ्या हेळसांडीचा त्रास आहे.
तीन हजारांपेक्षा अधिक अर्ज
अनेकांनी सुरुवातीलाच प्रस्ताव सादर करूनही अनुदान मिळाले नाही. राज्य सरकारच्या पोर्टलच्या माध्यमातून अनुदान मिळण्यासाठी तीन हजारापेक्षा अधिक जणांनी अर्ज केले. जिल्हा रुग्णालय व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रक्रिया करून सर्व प्रस्ताव शासनाकडे पाठवले. त्यांना अनुदान मंजूर झाल्याचे पोर्टलवर दाखवण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात किती जणांना रक्कम दिली, याची माहितीच प्रशासनाकडे उपलब्ध नाही.
चार महिने पोर्टल बंद
चार महिन्यांपासून तर योजनेचे पोर्टलच बंद होते. यामुळे नेमकी काय प्रक्रिया सुरू आहे, प्रक्रिया कोठे पोहोचली, यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही माहिती कळत नव्हती. यामुळे अनेकांचा योजनाच बंद झाल्याची खात्री झाली होती. आता ३० दिवसांपूर्वी पुन्हा पोर्टल सुरू केले आहे. सध्याही पोर्टलवर काही समजत नाही.
सरकार बदलले, अस्वस्थता
राज्यात ठाकरे सरकारने ही योजना सुरू केली होती. सुरुवातीपासूनच योजनेला घरघर लागली होती. राज्यात सत्ताबदल झाला आहे. नवीन सरकारने जुन्या योजना बंद करण्याचा सपाटाच लावला. यामुळे अनुदानापासून वंचित असलेल्या लाभार्थींमध्येही अस्वस्थता आहे. नव्या सरकारने ही याेजनाही बंद केली की काय, असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र, राज्य सरकारने याबाबत काहीही सांगितले नाही.
अनेक संसार उद्ध्वस्त
धाराशिव जिल्ह्यात ७६ हजार ९ नागरिकांना कोरोनाची लागण, ७३ हजार ८८५ कोरोनामुक्त. कोरोनाने २११९ मृत्यू, तीन हजारांहून अधिक अर्ज आले.५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान तुटपुंजेच, ते मिळण्यासाठी हेलपाट्यांमुळे निराशा. रुग्णालयात १५३८ जणांचा तर ३६५ जणांचा मृत्यू जिल्ह्याबाहेर, दुर्धर आजारात १०७ दगावले.
२५० पैकी ६५ जण आले
सातत्याने पाठपुरावा करूनही फायदा होत नाही, याची जाणीव आता लाभार्थींना होत आहे. यामुळे अनेकांनी अनुदानाची आशा सोडली. २७ फेब्रुवारीला जिल्हा तक्रार निवारण समिती बैठकीसाठी २५० जणांना बोलावले होते. मात्र, केवळ ६५ जणांनीच सुनावणीत भाग घेतला. यापूर्वी ५०० जणांच्या तक्रारींचा निपटारा करून शासनाला पाठवले. मात्र, शासनाने काहीच प्रतिसाद दिला नाही.
लवकरच अनुदान
पोर्टलच्या रिपोर्टमध्ये आकडा कमी असला तरी अनेकांनी प्रत्यक्षात अनुदान मिळाल्याचे सांगितले आहे. तसेच आता पोर्टल सुरू झाल्याने काही अडचण येणार नाही. लवकरच सानुग्रह अनुदान प्राप्त होण्यास मदत होणार आहे. -वृषाली तेलोरे, जिल्हा समन्वयक, आपत्ती व्यवस्थापन विभाग.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.