आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतप्त शहरवासीयांचा प्रश्न:हायवे क्रं. 65 वर खड्डे, अर्धवट कामांमुळे अपघातात 5 महिन्यांत 11 जणांचा मृत्यू; महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी केव्हा जागे होणार

नळदुर्गएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ सोलापूर ते हैदराबाद रोडवरील नळदुर्ग ते जळकोट दरम्यान रोडवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. मागील पाच महिन्यांत या रोडवर नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

जोपर्यंत बायपास रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत सोलापूर-हैदराबाद रोडच्या डागडुजीची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ती टोलवसुली करणारी एसटीपीएल कंपनी व महामार्गाचे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे या खड्ड्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आणखी किती जणांचा जीव गेल्यावर संबंधीत खात्याचे अधिकारी जागे होणार, सोलापूर-हैदराबाद रोडचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार, असा संतप्त सवाल नळदुर्ग येथील नागरिक विचारत आहेत. नळदुर्गच्या बाहेरून गेलेल्या बायपास रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये नळदुर्ग बसस्थानक ते जुना जकात नाका दरम्यान अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागले.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ सोलापूर-हैदराबाद रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला २०१२ मध्ये मंजुरी मिळाली होती. परंतु जागा हस्तांतरित करणे व मावेजा देण्यातच दोन वर्ष गेले. ७८० कोटींचे बजेट असलेल्या सोलापूर ते कर्नाटक सीमेपर्यंत १०० किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला प्रत्यक्षात ३ जून २०१४ रोजी सुरुवात झाली. हा रस्ता ९१० दिवस पूर्ण करणे गरजेचे होते. परंतु ८ वर्षे पूर्ण होऊनही राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी व ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे अणदूर ते उमरगा दरम्यान अनेक ठिकाणी कामे अर्धवट अवस्थेत आहेत.

सोलापूर- हैदराबाद या रोडवर दर दोन दिवसातून एकदा अपघात होतो. नादुरुस्त वाहनांमुळे आठ ते दहा तास वाहतूक कोंडी होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला चार चार किलोमीटरच्या रांगा लागतात. त्यामुळे आंध्रप्रदेश, कर्नाटक व तेलंगणा येथून शिर्डी व तुळजापूर येथे दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना लांबलचक रांगांमध्ये ताटकळावे लागते. तसेच नळदुर्गचा ऐतिहासिक किल्ला पाहण्यासाठी दूरवरुन पर्यटक येतात. परंतु त्यांना ट्रॅफिक जामचा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे एनएचआयएने (नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया) गांभीर्याने लक्ष देऊन बायपास रोडचे काम तत्काळ पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

अपघातप्रवण क्षेत्राचा फलक आवश्यक
नळदुर्ग ते जळकोट दरम्यान अनेक ठिकाणी वळण रस्ते व मोठा घाट असल्याने समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी अपघातप्रवण क्षेत्र, असा नामफलक लावणे आवश्यक आहे.

अधिकाऱ्यांकडून दिशाभूल
सोलापूर-हैदराबाद रोडच्या चौपदरीकरण कामासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून विचारपूस झाल्यावर मान हलवत लवकरच काम पूर्ण होईल, असे गोलमाल उत्तर देऊन संबंधीत अधिकारी, लोकप्रतिनिधींची दिशाभूल करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात कठोर भूमिका घेत त्यांना जाब विचारुन वठणीवर आणण्याची मागणी होत आहे. अन्यथा एखाद दिवशी नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रस्ता, उड्डाणपुलाचे काम बाकी असताना टोलवसुली
बायपाससह अनेक ठिकाणी रस्त्याचे व उड्डाणपुलाचे काम बाकी असताना ८० टक्के काम पूर्ण झाल्याचे दाखवत फुलवाडी टोल नाक्यावर एसटीपीएल कंपनीकडून टोल वसूली सुरू आहे. मात्र नळदुर्ग ते जळकोट दरम्यान रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांमुळे अनेक जणांना बळी जात आहे. त्याची जबाबदारी एसटीपीएल कंपनी घेणार की महामार्ग अधिकारी, असा प्रश्न नागरिक विचरत आहेत.

१८ अपघातात ११ मृत्यू
रोडवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे १ जानेवारी ३१ मे २०२२ या ५ महिन्यांच्या कालावधीत नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत महामार्गावर झालेल्या १८ अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले. त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.

बातम्या आणखी आहेत...