आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावागावात बैठका:कळंबमध्ये पुन्हा इतिहास घडणार, 40 हजार मराठ्यांचा 19 तारखेला भव्य मोर्चा

कळंबएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मूक मोर्चा, आंदोलने होऊनही मराठा समाजाला शाश्वत आरक्षण मिळालेेले नाही. तसेच शासनाने वारंवार घोषणा करूनही वेगवेगळ्या मागण्या पूर्ण न केल्यामुळे कळंबमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने पुन्हा एकदा आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. १९ तारखेला कळंब उपविभागीय कार्यालयावर हा मोर्चा निघणार असून, या मोर्चात तालुक्यातील ४० हजारांवर मराठे सहभागी होतील, असे सांगण्यात येत आहे. त्यासाठी गावागावात बैठका घेतल्या जात आहेत.

मराठा समाजाला संविधानिकदृष्ट्या कायद्याच्या चौकटीत टिकणारे मराठा आरक्षण हे “ओबीसी” प्रवर्गातूनच दिले जावे, यासाठी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी सहभागाचे आवाहन सुरू आहे. समाजावर होत असलेला अन्याय, शिक्षण क्षेत्रातील पिछेहाट, आरक्षणाच्या संदर्भातील कायदेशीर तरतुदींमुळे नोकरीत घटत आहे. आरक्षणासाठी ५ वर्षांपूर्वी राज्यातील सकल मराठा समाजाने शांततामय मार्गाने ५८ मोर्चे काढले.त्यानंतर ठोक मोर्चेही काढण्यात आले. मात्र अद्यापही आरक्षण मिळाले नाही. कायदेशीरदृष्ट्या मराठा समाजाला केवळ ओबीसी प्रवर्गातून दिलेले आरक्षण टिकू शकते, या मुळ मुद्द्यावर समाजाची एक वाक्यता झाली असून, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावे, यावर एकमत झाल्याचे संयोजकांनी सांगितले आहे.दरम्यान, मोर्चाच्या माध्यमातून पुन्हा कळंब तालुक्यात मराठे इतिहास घडवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

स्वखर्चाने जनजागृती गावागावांत जनजागृतीसाठी स्वयंसेवकांच्या टीम दररोज दाखल होत आहेत तर ७ वाहनांच्या स्पिकरवरून मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. नियोजनासाठी समाजाकडून एकही रुपया न घेता स्वयंसेवकांच्या स्वखर्चातून कार्य सुरू आहे. प्रत्येक घटकाने वेगवेगळी जबाबदारी स्वीकारली असून,त्यामुळे रक्कम संकलित करण्यात येणार नाही, असे नियोजन ठरले आहे. कुणी वाहनांची, कुणी डिजिटल होर्डिंग्ज,पाणी, प्रचार साहित्य आदींची जबाबदारी स्विकारली असल्याचे संयोजकांनी सांगितले.

शिस्तीत मोर्चा, पण शहर दणाणणार मराठा मोर्चामध्ये विद्यार्थिनी अग्रभागी असतील. त्यानंतर महिला व त्यानंतर मुले, तरुण,असे नियोजन सुरू आहे. मात्र, सुरूवातीच्या मोर्चाप्रमाणे आता मौन पाळले जाणार नाही तर हक्काच्या मागण्यांसाठी जोरदार घोषणा दिल्या जातील,त्यामुळे शहर दणाणून जाणार आहे.

६ डिसेंबर २०१६ नंतर दुसऱ्यांदा दिसणार विक्रमी गर्दी कळंब तालुक्याला निझामाच्या काळापासून आंदोलने व चळवळी झालेल्या आहेत. त्यामुळे तालुक्याला चळवळीचा इतिहास आहे. मात्र कळंब तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ६ डिसेंबर २०१६ ला कळंबच्या इतिहासातील पहिला आणि सर्वात मोठा मराठा समाजाचा महामोर्चा निघाला असल्याचे वयोवृद्ध सांगतात. आता दुसऱ्यांदा तेच मराठे दुसरे रेकॉर्ड तयार करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...