आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:कडदोरा गावात घरोघरी नळजोडणी, 29 वर्षांनंतर मिटला पाण्याचा प्रश्न; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या हस्ते नळ योजनेचे उद्घाटन

उमरगा16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कडदोरा येथील जगदंबा नगर भागात भूकंपात पुनवर्सन झाल्यापासून या भागात नळाला पाणी येत नव्हते. २९ वर्षांपासून हा भाग नळ योजनेपासून वंचित होता. यासाठी अनेकदा आंदोलन, निवेदन देऊन कायमस्वरुपी योजना कार्यान्वित होत नव्हती. यामुळे येथील ग्रामस्थांना घागरभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती.

कडदोरा येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या माध्यमातून सार्वजानिक विहीर व संपूर्ण गावात पाइपलाइन करुन घरोघरी नळ जोडणी देण्यात आली. शनिवारी (दि. ३०) या योजनेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी जिप सदस्य सुरेश बिराजदार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

गावात सर्वांना समान पाणी वाटप होण्यासाठी ग्रामपंचायतीने विशेष लक्ष घालून घर तेथे नळ जोडणी केली आहे. या वेळी प्रा. बिराजदार यांनी गावाच्या विकासात पाण्याचे महत्त्व व भूजल पातळी वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न आवश्यक असल्याचे सांगितले. यासाठी युवकांनी योगदान देण्याचे आवाहन केले. पेयजल योजना मंजूर करण्यासाठी, तसेच योजनेत येणाऱ्या समस्या, अडचणींवर करत योजना यशस्वी करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल ग्रामस्थांमार्फत सुरेश बिराजदार, माजी उपसरपंच साहेबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या उद्घाटन सोहळ्यास सरपंच सुनंदाताई रणखांब, ग्रामसेवक अलिफ शेख, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी रणखांब, लिंबाबाई यमगर, प्रदीप बालकुंदे, मारुती रणखांब, रमेश रणखांब, माधव पाटील, भरतकुमार रणखांब, सतीश रणखांब, विकास रणखांब, बलसूरचे नांगरे, उपसरपंच सतीश वाकडे, गोविंदराव हत्तरगे, शेषेराव रणखांब, संजय रणखांब, बंडू रणखांब, माधवराव रणखांब, सोपान माने, ज्ञानेश्वर रणखांब, ग्रामपंचायत कर्मचारी बाळू कुंभार, शरद रणखांब, संगणक परिचालक प्रशांत चौहान, संतू सुरवसे, ग्रामस्थ उपस्थित होते. नळ योजनेची घरोघरी जाऊन प्रा. बिराजदार यांनी पाहणी केली. उन्हाळ्याचे दिवस असून पाणी मुबलक येत असले तरी ग्रामस्थांनी काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले.

वनवास संपला
घराजवळ पाणी मिळत असल्याने आम्हाला इतर कामे करण्यासाठी वेळ मिळत आहे. नळ योजनेमुळे अनेक वर्षांपासूनचा वनवास संपला असून, पाण्यासाठी होणारी पायपीट कमी झाली आहे.
- रंजना साळुंके, गृहिणी.

नागरिक आनंदी
मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या माध्यमातून गावात पाण्यासाठी नागरिकांची होणारी पायपीट आता बंद होणार आहे. कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गावात प्रत्येकाच्या घराजवळ पाणी पाहून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
- सुनंदा रणखांब, सरपंच.

बातम्या आणखी आहेत...