आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्राउंड झीरो रिपोर्ट:कोरोना कसा संपणार, यंत्रणा सुस्तावली; नागरिकही बिनधास्त, रोज 200 ने वाढ

उस्मानाबाद / उपेंद्र कटके4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एप्रिल-मे महिन्यापेक्षा परिस्थिती अगदी उलट, यंत्रणेमध्ये निर्माण झाल्या अनेक चुका

सध्या कोरोनाचा कहर जोमाने बरसत असताना यंत्रणा पूर्णपणे सुस्तावली आहे. एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेणे, त्यांना क्वाॅरंटाइन करणे, त्यांची टेस्ट घेणे हा प्रकारच सध्या बंद झाल्यात जमा आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात येणे अशक्य झाले आहे.

मार्चमध्ये कोरोनाची लागण होण्यास प्रारंभ झाल्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अन्य यंत्रणा अत्यंत सतर्क होत्या. एप्रिलपासून जुलैपर्यंत एखादा रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील हायरिस्क काँटॅक्टमधील रुग्णांचा शोध घेतला जात होता. बहुतांश ठिकाणी तर मोबाइल लोकेशनच्या माध्यमातून रुग्ण कोठे फिरला, कोणाला भेटला याचा मागोवा घेतला जात होता. घरातील सर्व नातेवाइकांना ताब्यात घेऊन त्यांना क्वाॅरंटाइन करण्यात येत होते. त्यांच्यावर उपचारही करण्यात येत हाेते. काेरोनाग्रस्त रुग्णावर लगेच उपचार सुरू होते. यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या अत्यंत कमी होती.

ऑगस्ट, सप्टेंबरपासून मात्र काँटॅक्ट ट्रेसिंग पूर्णपणे ढेपाळली आहे. आता रुग्णांना अधिक त्रास जाणवत असेल तर तेच स्वत:हून रुग्णालय गाठत आहेत. तरीही त्याच्या संपर्कातील व्यक्तींना शोधले जात नाही. एवढेच काय एखादा रुग्ण मृत झाला असेल तरीही ट्रेसिंग केली जात नाही. यामुळे रुग्णसंख्या १२ हजार १७२ झाली आहे. यामध्ये दोन हजार ४१३ रुग्ण प्रत्यक्षात उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात १३३१ खाटा, २४१३ रुग्ण
जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी १३३१ खाटा आहेत. मात्र, उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या २४१३ आहे. यामुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उपचार देण्यात येत आहेत. डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून १० ठिकाणी मान्यता आहे. यापैकी तीन सरकारी रुग्णालये आहेत. अन्य ७ खासगी आहेत. हेल्थ सेंटरमध्ये १२ रुग्णालयांचा समावेश आहे. यामध्ये चार सरकारी तर अन्य खासगी रुग्णालये आहेत.

नागरिकही जबाबदार
सध्या महसूल व पोलिस यंत्रणेमधील अनेक कर्मचाऱ्यांना बाधा झाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पूर्वीप्रमाणे सहकार्य मिळत नसल्याच्याही तक्रारी आहेत. नागरिक थेट रस्त्यावर मास्क न लावता गर्दी करत आहेत. सॅनिटायझरही वापरले जात नाही. हे तर सुरूच असून पाॅझिटिव्ह रुग्णही आपल्या संपर्कातील नागरिकांचे नाव सांगत नाही. अनेकजण तर तपासणी करण्यासाठीही नकार देत आहेत.

९.७ % हवी ट्रेसिंग
सद्य:स्थितीत एका रुग्णाच्या पाठीमागे ९.७ व्यक्तींची ट्रेसिंग करण्याचे निर्देश आहेत. मात्र, आता एका रुग्णाच्या पाठीमागे चार व्यक्तींचीही ट्रेसिंग केली जात नाही. विशेष म्हणजे सामूहिक संसर्ग वाढला असतानाही यंत्रणा अपुरी पडत आहे. आशा व अंगणवाडी स्वयंसेविकांनी या प्रक्रियेतून अंग काढून घेतल्यासारखी परिस्थिती आहे.

नागरिकांचा प्रतिसाद नाही
आरोग्य यंत्रणा अद्यापही सक्षमतेने काम करत आहे. मात्र, काही नागरिकच प्रतिसाद देत नाहीत. आरोग्य कर्मचाऱ्यांना हुसकावून लावण्याचे प्रकार घडत आहेत. जिल्ह्यात १९ आशांनाही कोरोनाची लागण झाली आहे. -डॉ. हनुमंत वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

यंत्रणेमध्ये वाढले दोष, रुग्णाची कोविड हेल्थ सेंटरमध्ये रवानगी
यंत्रणेमध्ये सध्या अनेक दोष आढळत आहेत. उस्मानाबादमध्ये जिल्हा रुग्णालयात आलेल्या एका रुग्णाची थेट कोविड हेल्थ सेंटरमध्ये रवानगी करण्यात आली. त्यांच्यावर १४ दिवस उपचार करण्यात आले. मात्र, उपचारानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह नसल्याचे आढळून आले होते. सामान्य नागरिकांमध्ये पाच फुटांचे अंतर ठेवण्याचे आवाहन करत असताना अनसुर्डा (ता. उस्मानाबाद) येथे कोरोनाग्रस्त रुग्ण व इतरांना १९ जणांना एकाच वाहनातून नेण्यात आले. बेंबळीतील हायरिस्क १४ जणांना उस्मानाबादला नेल्यावर त्यांनी अँटिजन टेस्ट घेतली. मात्र, टेस्ट घेणाऱ्यालाच कोणत्या क्रमाने उभे केले हेच समजले नाही. यामुळे त्याने अंदाजानेच पॉझिटिव्ह रुग्ण सांगितले.

रुग्णांचा मागोवा सुरूच
शहरी व ग्रामीण भागात रुग्णांचा मागोवा सुरू आहे. एकास नऊ प्रमाणे शोध घेतला जात आहे. त्यांना शोधून त्यांच्यावर उपचारही करण्यात येत आहेत. मागोवा होत नसल्याचा आरोप चुकीचा आहे. -डॉ. एन. बी. गोसावी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक.

मृत्युदर वाढतोय
जिल्ह्यातील एकूण मृत व्यक्तींची संख्या ३७५ वर पाेहोचली आहे. यामुळे मृत्युदर ३.०८ वर पोहोचला.

जिल्ह्याची स्थिती
११० व्हेंटिलेटर
१९६ अतिदक्षता कक्षातील खाटा
४३६ सामान्य खाटा
१००६ खाटांना ऑक्सिजन व्यवस्था
१३७१ खाटा
२४१३ उपचाराखालील रुग्ण
१२,१७२ आजवरचे एकूण रुग्ण

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser