आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक मनात, हृदयात आहेत. महाराजांनी आई जिजामाता यांना आपले गुरू मानले. त्यांनी संतांचा सन्मान केला तसेच आपल्या संस्कृतीचे रक्षण केले. त्यामुळेच आपली संस्कृती टिकून राहिली. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपली संस्कृती लोप पावली असती, असे मत श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले. तत्पूर्वी या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी राडा करण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे रविशंकर यांनी कार्यक्रमातच स्पष्टीकरण दिले. महाराजांबद्दल जे ऐकलो होतो तेच बोललो, मला त्या वादात पडायचे नाही. मोठ्यांचा आदर करणे आपली संस्कृती आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तुळजापुरात गुरूवारी सायंकाळी जागर भक्तीचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमादरम्यान संभाजी ब्रिगेडने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. कारण, यापूर्वी एका कार्यक्रमात रविशंकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू समर्थ रामदास असल्याचा उल्लेख केला होता. त्यावर रविशंकर यांनी जाहीरपणे स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले,आपली संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी अनेक पिढ्यांपासून संतांनी योगदान दिले आहे. अशा संतांचा त्या काळात शूर शूरविरांनी सन्मान केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर सबंध देशाला आपल्या कार्याने प्रभावित केले. त्यांना तुळजाभवानी मातेने प्रेरणा दिली. तुळजाभवानी माता आपली सगळ्यांची प्रेरणा आहे.
मातेला आपण गुरू, आई आणि वडील मानतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य अद्वितीय होते.त्यांनी प्रत्येकाच्या मनात आपला ठसा उमटविला. त्यांनी संतांचा आदर केला तर संतांनी सगळ्या जातींना आपले मानले. मराठ्यांनी महाराष्ट्रातच नाही तर तामिळनाडूतही राज्य केले. त्यांनी तिथेही मंदिरांचे रक्षण केले.आपल्या शास्त्रात भेदाभेद अमान्य आहे. अस्पृश्यता कुठेही नसावी. हजारो ऋषीमुनींमध्ये ब्राह्मण मोजकेच होते,अन्य जातीतले अनेकजण मुनी होते.सगळेजण एकोप्याने वागत होते, ही आपली संस्कृती आहे. आपणही हे टिकायला हवे.
मात्र अलीकडे असे दिसत नाही. आपणच आपल्या माणसांचा अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण भांडू लागलो आहोत. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना समजून घ्यायला हवे.त्याची दु:खे संपण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. मुलांवर चांगले संस्कार घडवा,आई-वडिलांचा, मोठ्या आदर करायला सांगा. तुळजापुरात १२ वर्षानंतर येण्याचा योग आला,त्यामुळे इथे आल्याचे समाधान वाटले. तत्पूर्वी श्री श्री रविशंकर यांचा कवड्याची माळ,तलवार देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. दरम्यान, श्री श्री रविशंकर यांनी संभाजी ब्रिगेडच्या राड्यानंतर पोलिसांच्या फौजफाट्यात तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.
जागर भक्तीचा
संभाजी ब्रिगेडच्या गोंधळानंतर श्री श्री रविशंकर यांचे स्पष्टीकरण, म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांमुळे भारतीय संस्कृती टिकून, तुळजापुरात कार्यक्रम, ब्रिगेडकडून कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न, गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई
संभाजी महाराजांचा सन्मान करतो, पण सगळ्या बाजूंनी अभ्यास करा : रविशंकर
कार्यक्रमादरम्यान संभाजी ब्रिगेडने गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. कार्यक्रमात रविशंकर यांनी महाराजांविषयी आपली भूमिका मांडली तसेच अखेरच्या टप्प्यात त्यांनी थेट संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले की आपण छोट्या छोट्या गोष्टीत न पडता सगळ्या बाजूंनी अभ्यास करावा.मी संभाजी महाराजांचा सन्मान करतो,आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या विचाराचे कार्य करता आहात,मनात कोणतीही कटूता ठेवू नका.
२० मिनिटे ध्यान : रविशंकर यांनी मार्गदर्शनानंतर ध्यानाची पद्धत सांगितली. यावेळी २० मिनिटे ध्यान झाल्यानंतर विठ्ठल विठ्ठल हे भजन सादर केले. यावेळी भक्तांनी ताल धरला. रविशंकर यांनी भक्तांमध्ये जाऊन फुलांची उधळण केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.