आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील चौरस्ता ते एकुरगावाडी परिसरात मागील अनेक वर्षांपासून बेकायदेशीर व विनापरवाना सुरू असलेल्या वीटभट्ट्या व खडी केंद्र बंद करण्याच्या मागणीसाठी वेळोवेळी निवेदन देऊनही कारवाई होत नसल्याने माडज ग्रामपंचायतीचे माजी सदस्य चंद्रकांत काळे यांनी मंगळवारपासून (दि.१०) येथील उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात नियमबाह्य स्टोन क्रशर व वीटभट्ट्या सुरू आहेत. ३०-३५ वर्षांपासून शेतकऱ्यांचे जीवनमान आधारीत असणारी माती, गौण खनिजाची बेकायदेशीर लूट सुरू आहे. परिसरातील मातीचा उपसा होत असल्याने भविष्यात येथे वाळवंट निर्माण होऊ शकते. त्यामुळे पशुधनाला चार-पाणी मिळणार नाही व नागरिकांना आत्महत्या करावी लागेल. पशु, पक्षी, वनस्पती, मानवाचे जीवन मातीवरच फुलते. पर्यावरणात माती व खडकांना खूप मूल्य आहे. मातीचा एक थर तयार होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. तालुका व परिसरातील वर्षाला अंदाजे हजाराहून अधिक हेक्टरवरील शेतीपयोगी मातीचा उठाव वीटभट्यांमुळे होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावी पिढ्या उद्ध्वस्त होईल. शिवाय हवा व पाण्याचे प्रदूषणही होत आहे. निवेदन देतेवेळी ग्रामपंचायत सदस्य गोविंदराव सूर्यवंशी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.