आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतमोजणी:आलूरमध्ये सरपंचपदी काँग्रेस आघाडी- शिंदे गट तीन ठिकाणी

मुरूमएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आलूर जिल्हा परिषद गटातील सात गावच्या ग्रामपंचायतीचे चित्र मंगळवारी झालेल्या मतमोजणीने स्पष्ट झाले आहे.सातही गावचे सरपंच पद महिलांसाठी राखीव आहे.आलूर,वरनाळ व बेळम ग्रामपंचायतीत सरपंच पदावर काँग्रेस आघाडीचे उमेदवार निवडून आले असून केसर जवळगा,कोथळी,कंटेकुर ग्रामपंचायतीत बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार सरपंच पदी निवडून आले आहेत.आनंद नगर या एकमेव ग्रामपंचायतीत सरपंच पदाची माळ भाजप उमेदवाराच्या गळ्यात पडली आहे.जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील प्रतिनिधित्व करत असलेल्या या गटात काँग्रेस पक्षाची स्थिती पूर्वी पेक्षा मजबूत झाल्याचे चित्र आजच्या निकालावरून दिसून येते.

आलूर ग्रामपंचायतीची सूत्रे काँग्रेस आघाडीच्या ताब्यात आली असून शिवसेना सत्तेतून पायउतार झाली आहे.१७ सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीत सरपंच पदासह काँग्रेस आघाडीचे १२ सदस्य,राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलचे ५ सदस्य निवडून आले आहेत तर बाळासाहेब ठाकरे शिवसेना (शिंदे गट) गटाचा एकही उमेदवार निवडून आला नाही.सरपंच पदी काँग्रेस आघाडीचे उमेदवार लीलावती राम जेऊरे या निवडून आल्या आहेत.

वरनाळमध्ये काँग्रेस आघाडी
सीमावर्ती भागातील वरनाळ सरपंचपदी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराचा विजय झाला आहे.७ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीत काँग्रेस आघाडीचे ३ तर बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे (शिंदे गट) ४ सदस्य आले आहेत.काँग्रेस आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार शहनमा तोळनुरे यांनी ४० मतांनी विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला आहे.

केसरजवळगा शिंदे गटाकडे
केसर जवळगा ग्रामपंचायत बाळासाहेब ठाकरे शिवसेना (शिंदे गट) ताब्यात गेली आहे.१३ सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीत शिंदे गटाचे ९ सदस्य तर काँग्रेस आघाडीचे ४ सदस्य निवडून आले आहेत.या ठिकाणी शिंदे गटाचे उमेदवार पूजा अमोल पटवारी (मावळते सरपंच अमोल पटवारी यांच्या पत्नी) या सरपंच पदी विराजमान झाल्या आहेत.

बेळममध्ये काँग्रेसचा झेंडा
बेळम ग्रामपंचायतीवर काँग्रेस आघाडीचा झेंडा फडकला असून सरपंच पदासह काँग्रेस आघाडीचे सर्व ११ उमेदवार विजयी झाले आहेत.याठिकाणी काँग्रेस आघाडीने प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव महालिंग बाबशेट्टी यांच्या मातोश्री श्रीमती सत्यभामाबाई शिवशरणप्पा बाबशेट्टी यांना सरपंच पदी उभे केले होते.सत्यभामाबाई बाबशेट्टी यांनी एकतर्फी विजय मिळविला.

कोथळी पुन्हा शिंदे गटाकडे
कोथळी ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे (शिंदे गट) आप्पासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचे सर्व ११ सदस्य विजयी झाले आहेत.याठिकाणी सरपंच पदी शिंदे गटाच्या लक्ष्मीबाई मधुकर सुरवसे या निवडून आल्या आहेत.

कंटेकुरमध्ये काँग्रेसला धक्का
विद्यमान सरपंच गोविंद पाटील यांची गेल्या वीस वर्षांपासून असलेली सत्ता संपुष्टात आली आहे.सरपंच पदासह शिंदे गटाचे ६ सदस्य निवडून आले आहेत.तर काँग्रेस आघाडीचे ३ उमेदवार निवडून आले आहेत.सरपंच पदी शिंदे गटाचे विजयाबाई शिवाजी जमादार या निवडून आल्या आहेत.

आनंद नगर ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात
आनंद नगर ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस आघाडी,भाजप व वंचित अशी तिरंगी लढत झाली होती.वंचित आघाडीने याठिकाणी सरपंच पदासाठी उमेदवार उभे केल्याने याचा फटका काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला बसला आहे.काँग्रेसच्या ताब्यातून ग्रामपंचायत खेचून घेण्यात भाजपला यश आले आहे.

७ सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीत काँग्रेस आघाडीचे ५ उमेदवार निवडून आले आहेत.तर भाजपचे २ उमेदवार निवडून आले आहेत.अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अनिता परमेश्वर जाधव यांच्या गळ्यात सरपंच पदाची विजयाची माळ पडली आहे.

बातम्या आणखी आहेत...