आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाप्रबोधन यात्रा:भाजपात महापुरुषांचा अवमान करणारी टोळीच सक्रिय, जनताच शिकवणार धडा

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफवांचे राजकारण, चारित्र्यहनन करण्याचे घाणेरडे राजकारण सध्या भारतीय जनता पार्टीकडून (भाजप) केले जात आहे. महापुरुषांचा अपमान करणारी टोळी भाजपमध्ये सक्रिय आहे. महाराष्ट्राची बदनामी करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. अशा राजकारणाला जनता वैतागली असून या सरकारला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या प्रा. सुषमा अंधारे यांनी केला.

शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त उमरगा येथे सोमवारी (दि.५) आयोजित सभेत प्रा. अंधारे बोलत होत्या. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबा पाटील होते. याप्रसंगी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबा पाटील, उपजिल्हाप्रमुख बसवराज वरनाळे, कमलाकर चव्हाण, दिपक जवळगे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. सुषमा अंधारे म्हणाल्या की, शिवसेना हा विचार आहे आणि विचार कधीच संपत नसतात. शिवसेना संपवायला निघालेले संपतील पण शिवसेना संपणार नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्यापूर्वी बरेच जण भ्रष्टाचारी होते. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते स्वच्छ आणि चारित्र्यसंपन्न, कसे झाले.

भाजपमधीलच बहूजन नेत्यांना जाणीवपूर्वक बोलायला भाग पाडून त्यांना बदनाम करण्याची खेळी करत त्यांना राजकारणातून संपवण्याचा डाव खेळला जात आहे, असाही आरोप प्रा. सुषमा अंधारे यांनी यावेळी केला. सभेला जिल्हाभरातून शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमगरा तालुका प्रमुख बाबुराव शहापुरे, अजित चौधरी, लोहारा तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, उपप्रमुख महेश शिंदे, संघटक सुमित कदम , उपशहर प्रमुख नितीन नागदे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष आण्णासाहेब पवार, गोपाळ शिंदे, सचिन जमादार, विजय भोसले, रणजीत सासुरे, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख शामल वडणे, जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य प्रसिद्धी प्रमुख रेखाताई सूर्यवंशी, जिल्हा कार्याध्यक्षा सुनंदाताई माने आदींची यावेळी विशेष उपस्थिती होती.

भाजपमध्ये गेलेल्यांचे दाखवले व्हिडिओ केंद्रीय मंत्री नारायण राणे, खासदार भावना गवळी, माजी मंत्री अर्जुन खोतकर, यशवंत जाधव, प्रताप सरनाईक, हर्षवर्धन पाटील यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कसे आरोप केले. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर सोमय्या शांत झाले. त्यांच्याविषयी भाजप नेत्यांच्या कशा प्रतिक्रिया आहेत. याचे व्हिडिओ अंधारे यांनी दाखवले. तसेच जोरदार टीका करून जनतेसमोर प्रश्न उपस्थित केले.

आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यावर टीकास्त्र निवडणूक लढविण्याची ऐपत नसताना जनतेने वर्गणी करून निवडणुकीत निवडून देत आमदार केले. शिवसेना प्रमुखांनी विश्वास दाखविला. पक्षाच्या जीवावर आमदार झाले. त्याच पक्षाशी खोक्यांसाठी बंडखोरी केली. आता येणाऱ्या निवडणुकीत जनता तुम्हाला माफ करणार नाही. जनताच तुम्हाला जागा दाखवेल, अशी बोचरी टीका आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यावर प्रा.सुषमा अंधारे यांनी केली.

लोकसभा निवडणुकीत माझ्या विरोधात प्रचार खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले की, उमरग्याची जनता सुज्ञ आहे. लोकसभेच्या वेळी माझ्यासोबत तालुक्यातील एकही शिवसेनेचा पदाधिकारी नव्हता. माझ्या विरोधात प्रचार केला. मात्र, उमरगा-लोहारा तालुक्यातील जनता शिवसेनेच्या बाजूने आहे. याच जनतेने मला २० हजारांचे मताधिक्य दिले. उमरग्याच्या जनतेला शिवसेनेशी गद्दारी पसंत नाही, गद्दारांना जनता नक्की धडा शिकवणार.

बातम्या आणखी आहेत...