आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकरांची माहिती:पाच वर्षात विद्यापीठ उपकेंद्राचा कायापालट, इमारती, रस्ते, प्रयोगशाळा उभारली

उस्मानाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्रात गेल्या पाच वर्षात प्रशासकीय तसेच विविध विभागाच्या इमारती, मुलींचे वसतिगृह, रस्ते, विश्रामगृह, प्रयोगशाळा आदी विकासकामे करण्यात आली आहेत. आणखी काही कामे प्रगतीपथावर आहेत. स्वतंत्र विद्यापीठासाठी आता केवळ २५ ते ३० कोटींच्या विकासकामांची गरज आहे. परिसरात साडेपाच हजार झाडे लावली असून, ओसाड माळरान भासणारा हा परिसर निसर्गरम्य झाला, विद्यापीठाने दिलेल्या संधीमुळे ही कामे करू शकलो, याचा अभिमान आहे, अशी भावना विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संजय निंबाळकर यांनी व्यक्त केली.

विद्यापीठ उपकेंद्रात सोमवारी (दि.२९) सकाळी निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेसाठी उपकेंद्राचे संचालक डॉ. दत्तात्रय गायकवाड, सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डाॅ. प्रशांत दीक्षित, जल व भूमी व्यवस्थापनाचे विभागप्रमुख डाॅ. नितीन पाटील उपस्थित होते. निंबाळकर म्हणाले, व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ ३१ ऑगस्ट रोजी संपत आहे. सदस्य झाल्यापासून पाच वर्षात उपपरिसरात अनेक कामे हाती घेतली. काही नवीन विभाग सुरू झाले. कोरोना काळात क्षेत्रात हजारो झाडे लावली. परिसरात वेगवेगळ्या विभागांना जोडणारे रस्ते तयार करण्यात आले. तसेच विज्ञान विभागासाठी स्वतंत्र इमारत उभी केली. आता या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यासाठी साडेपाच कोटी अतिरिक्त निधी मंजूर झाला असून, कामही अंतिम टप्प्यात आहे. १०० मुलींसाठी स्वतंत्र सुसज्ज वसतिगृह उभारले. विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी ८ सुट असलेले अद्ययावत विश्रामगृह बांधले. परिसराला भविष्यात पाणी टंचाई भासू नये, यासाठी ६० फूट विहिर खोदली आहे. या कामांसाठी गेल्या पाच वर्षात विद्यापीठाच्या फंडातून ३० कोटी रूपये निधी मंजूर करून आणला आणि त्यातून परिसरात अनेक उपयुक्त कामे करता आली, याचा आनंद आहे. आता मुलांचे वसतिगृह आणि अन्य काही कामे बाकी आहेत. या कामाचा शुभारंभ मंगळवारी कुलगुरू डॉ. प्रमाेद येवले यांच्या हस्ते होणार आहे, असे निंबाळकर यांनी सांगितले. तसेच उपकेंद्राच्या वतीने शिक्षणतज्ञ एम. डी. देशमुख यांना जीवनसाधना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता होणार आहे. विकासकामांसाठी केलेल्या सहकार्याबद्दल विद्यापीठासह उपकेंद्र संचालक, विभागप्रमुख, प्राध्यापकांसह कर्मचाऱ्यांचेही निंबाळकर यांनी आभार मानले.

शेतकऱ्यांसाठी अत्यल्प दरात माती, पाणी परीक्षण
निंबाळकर म्हणाले, शेतकऱ्यांची गरज विचारात घेऊन आणि विद्यार्थ्यांसाठी उपकेंद्रात ३२ लाख रूपयांची माती व पाणी परीक्षण प्रयेागशाळा उभारण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत शेतकऱ्यांना माती, पाणी परीक्षण नाममात्र दरात करून दिले जाणार आहे. डॉ. नितीन पाटील म्हणाले, या माती परीक्षणानंतर जमिनीचा पोत विचारात घेऊन संबंधीत शेतात शेतकऱ्यांनी काय पेरावे, याबद्दलचे मार्गदर्शनही करणार आहोत.

लोकसहभागातून प्रयोगशाळा
स्वॅब तपासण्यासाठी जिल्ह्यात प्रयोगशाळा नसल्यामुळे कोरोनाच्या पहिल्याच लाटेत कोविड रूग्णांचे स्वॅब पुणे, मंुबई, सोलापूर, औरंगाबाद, लातूर आदी जिल्ह्यात पाठवावे लागत होते. मात्र,तत्कालिन जिल्हाधिकारी दीपा मुधाेळ-मुंडे यांना आपल्याच उपकेंद्रात प्रयोगशाळा उभारण्याची विनंती केली, त्यांनी विनंती मान्य करून लोकसहभागाचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसादही मिळाला.त्यांच्या प्रयत्नातून सुमारे अडीच कोटी रूपयांची प्रयोगशाळा उभारली, त्याचा दुसऱ्या, तिसऱ्या लाटेत स्वॅब तपासणीसाठी फायदा झाला. आजही ही प्रयोगशाळा सुरूच आहे. लोकसहभागातून उभारलेली ही पहिलीच प्रयोगशाळा असावी, असे निंबाळकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...