आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधी नसल्याने शस्त्रक्रिया थांबल्या:चार महिन्यांत 2331 जणांचे तोडले श्वानांनी लचके ; रोज 19 जणांचा चावा

हरेंद्र केंदाळे | उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात मोकाट श्वानांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून लचके तोडण्याचा प्रकार रोजचा होऊन बसला आहे. चार महिन्यात २३३१ जणांचा श्वानांनी चावा घेतल्याची नोंद जिल्हा रुग्णालयात आहे. त्यानुसार दररोज किमान १९ जणांचे श्वानानी लचके तोडल्याच्या घटना घडल्या आहेत.महिन्याला कमीत कमी ५८२ जणांना श्वानांमुळे जखमी होण्याचे प्रकार झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले. विशेष म्हणजे यात खासगी मध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची नोंद करण्यात आली नाही.शहरात सद्या मोकाट कुत्रे आणि वराहांची दहशत वाढली असून नगर परिषदेकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून आले.

कारण गेल्या महिन्यापासून शहरात सुरु असलेली कुत्र्यांवरील निर्बीजीकरण शस्त्रक्रिया निधी आणि श्वानासाठी निवारा नसल्याने बंद करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शहरातील वराहांची दहशत वाढत चालली आहे. विशेष म्हणजे ज्या रस्त्यांवर चिकन आणि मटणांची अनधिकृत दुकाने थाटली गेली आहे, अशा रस्त्यांवर कुत्र्यांचा सुळसुळाट अधिक वाढला आहे. त्याच बरोबर या भागातील कुत्रे अधिक आक्रमक असल्याचेही दिसून येत आहे. यांचे टोळकेच रस्त्यावर फिरत असल्याने एका व्यक्तीकडून त्यांना हाकलून लावण्याचा प्रयत्नही होऊ शकत नाही. बार्शी नाका ते माणिक चौक ते मध्यवर्ती इमारत. औरंगाबाद रोड ते देशपांडे स्टँड चौक, सांजा रस्ता या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात मोकाट श्वानाची दहशत दिसून येत आहेत. या बाबत नगर परिषदेचे मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

खासगी संस्थेकडून ६०० कुत्र्यांचे निर्बीजीकरण
नगर परिषदेने अॅनिमल वेल्फेअर खासगी संस्थेला काम देऊन शहरातील कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचे काम दिले. संस्थेने दोन महिन्यात नऊ लाख रुपये घेऊन ६०० कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली. उर्वरीत राहिलेल्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने कुत्र्यांची शहरात दहशत वाढत चालली आहे.

एप्रिल ते जुलै महिन्यापर्यंतची अशी आहे आकडेवारी
शहरातील जिल्हा रुग्णालयात एप्रिल ते जुलै महिन्यांपर्यंतची आकडेवारी उपलब्ध झाली. त्यानुसार या चार महिन्यात दोन हजार ३३१ जणांचे कुत्र्यांनी लचके तोडल्याची घटना घडली. विशेष म्हणजे ही केवळ शासकीय रुग्णालयाची आकडेवारी आहे. ज्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले, त्यांची आकडेवारी बघितल्यास श्वानाच्या चावण्याची आकडेवारी अधिक असू शकते.

बातम्या आणखी आहेत...