आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरवाढीचा परिणाम:कर्नाटकात पेट्रोल 111.88 रुपये प्रतिलिटर; उमरगेकरांकडून कर्नाटक सीमेवर जात 9 रुपये स्वस्त पेट्रोल खरेदी

उमरगा8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने वाहनधारकांबरोबर सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. इंधनाचे दर वाढल्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांनीही साहित्याच्या दरात वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढला आहे. मात्र, कर्नाटकात पेट्रोल (१११.८८ रुपये) प्रतिलिटर ९ तर डिझेल (९५.५२ रुपये) ८ रुपयांनी कमी आहे. त्यामुळे तालुक्यातील व परिसरातील वाहनधारक कर्नाटकातील बसवकल्याण, आळंद तालुक्यातील पेट्रोल पंपावरून इंधन खरेदी करत आहेत.

जिल्ह्यातील उमरगा तालुका कर्नाटक सीमेलगत असल्याने साधारणतः २० ते २५ किलोमीटर अंतरावर कर्नाटक राज्यातील पेट्रोल पंप आहेत. कर्नाटकात पेट्रोलचा दर १११ रुपये ८८ पैसे असून, उमरग्यात १२० रुपये ९२ पैसे म्हणजे लिटरमागे नऊ रुपये ०४ पैसे कमी दर आहे. कर्नाटकात डिझेलचा दर ९५ रुपये ५२ पैसे प्रतिलिटर आहे, तर उमरग्यात १०३ रुपये ६१ पैसे लिटर दर आहे. लिटरमागे आठ रुपये ०९ पैसे कमी दर असल्यामुळे ट्रक व्यावसायिक कर्नाटकातून डिझेल खरेदी करतात. साधारणतः चारशे लिटर क्षमतेची टाकी कर्नाटक राज्यातील पंपावर भरली तर साधारणत: तीन हजार २३६ रुपयांची बचत होत आहे. तालुक्यातून कर्नाटकात काही कामानिमित्त गेलेले आणि आवर्जून जाणारे दुचाकीचालक पेट्रोलची टाकी फुल्ल करत असल्यामुळे तालुक्यात जवळपास २० पंपधारकांचा व्यवसाय मंदावला आहे.
..तर इंधनाची तस्करी वाढेल : महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात पेट्रोल-डिझेलच्या दरातील मोठ्या तफावतीने वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे. मालवाहतुकीचा खर्च वाढल्याने साहित्याच्या दरवाढीचाही फटका सर्वसामान्यांना बसत आहे. कर्नाटकात पेट्रोलचा दर कमी असल्याने तेथून अनेक जण साठा उपलब्ध करून येथे चार-पाच रुपये आगाऊ रक्कम घेऊन विक्री करण्याचे प्रकार काही ठिकाणी सुरू आहेत. अनेक व्यावसायिक वाहनांसाठी डिझेलचा स्टॉक करून ठेवत आहेत.

महाराष्ट्रात दर जास्त कशामुळे? : महाराष्ट्रात व्हॅट अधिक असल्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर अधिक आहेत. सरकारने व्हॅट कमी केल्यास कर्नाटकप्रमाणेच पेट्रोल आणि डिझेलचे दर काही प्रमाणात कमी होऊ शकतात.

कर्नाटकातच करतो खरेदी
नोटबंदी व जीएसटीमुळे ट्रक व्यवसायावर आर्थिक मंदीचे सावट आले होते. पुन्हा कोरोना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला. डिझेल दरवाढीने तर व्यवसायाला चाळणी लागत आहे. भाडे परवडत नाही. सीमेवरील कर्नाटकात लिटरमागे आठ ते साडेसाठ रुपये दर कमी असल्याने तेथेच डिझेलची खरेदी करतो.
-चंद्रशेखर पवार, ट्रक व्यावसायिक.

व्हॅट कमी करावा
राज्य सरकारने इंधनावरील व्हॅट कमी करावा. तालुक्यातील अनेक वाहनधारक कर्नाटकात डिझेल खरेदीसाठी जातात. त्याचा परिणाम उमरगा परिसरातील पंपचालकांच्या व्यवसायावर होत आहे.
- रजाक अत्तार, अध्यक्ष, पेट्रोल पंप व्यावसायिक संघटना.

बातम्या आणखी आहेत...