आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील ग्रामपंचायतींनी रस्त्यावर बसवलेले पथदिवे सकाळी बंद करण्याचे व्यवस्थापन नसल्याने दिवसरात्र सुरूच रहात आहेत. तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतींमधील ९६ गावात एलईडी व हायमास्ट पथदिवे बसवण्यात आले आहे. मात्र, हे पथदिवे सुरू झाल्यावर ते कोणी व कसे बंद करायचे याचे व्यवस्थापन नसल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायती ईट, पाथरुड, वालवड व माणकेश्वर येथील पथदिवे बंद करण्याची व्यवस्था आहे. मात्र, उर्वरित बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये हे पथदिवे दिवसरात्र सुरू रहात आहेत. यामुळे विजेचा अपव्यय होत आहे. हे पथदिवे बसवण्यास काही वर्ष झाली आहेत. त्यातील लाइट खराब झाल्यास किंवा अन्य कारणाने बंद पडल्यास ते बंदच रहातात.
गेलेले लाइट काढून ग्रामपंचायती नवीन लाइट लावतात. पुन्हा ते दिवसरात्र चालु राहतात. तालुक्यातील ग्रामपंचायींमध्ये सर्व पथदिवे दिवसा बंद व अंधार पडताच पुन्हा चालु करण्याची व्यवस्था नाही.पुष्कळ ग्रामपंचायतींमध्ये हायमास्ट दिवे बसवण्यात आले आहेत. तेही चालुच राहतात. ग्रामपंचायतींकडून नवीन दिवे लावूनही ते बंद करण्याची तसदी घेतली जात नसल्याने वीज वाया जात आहे. या वीजबिलाचा भरणाही केला जात नाही.
पथदिव्यांमुळे रात्री छान प्रकाश पडतो. मात्र, हे प्रखर दिवे दिवसाही सुरू रहात असल्याने विजेचा प्रचंड अपव्यय होत आहे. त्यामुळे दिवसा दिवे बंद करण्याची व्यवस्था करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. त्यामुळे यावर तत्काळ तोडगा काढून पथदिवे दिवसा बंद राहणार, हे सुनिश्चित करणे आवश्यक झाले आहे.
भूम पालिकेचे योग्य नियोजन, दिवसा दिवे असतात बंद
भूम नगगरपरिषदेचा दिवसा एकही दिवा चालु नसतो. मात्र, तालुक्यातील ग्रामपंचायती दिवसरात्र पथदिवे सुरू ठेवत आहेत. यासंबंधी महावितरण अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता ‘मला प्रतिक्रिया देणे उचित ठरणार नाही, याचे अधिकार वरिष्ठांचे असल्याचे सांगितले. परंतु ग्रामपंचायतींना पथदिवे दिवसा बंद ठेवण्याबाबत आदेश देऊ’ असे सांगितले.
ग्रामपंचायतींवर कारवाई करा
ग्रामपंचायतींमार्फत बसवण्यात आलेले पथदिवे दिवसा बंद करण्याची व्यवस्था सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांनी करावी. अन्यथा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिवसा पथदिवे चालु रहात असल्याबाबत ग्रामपंचायतींवर कारवाई करावी. - भास्कर महादेव वारे, आरटीआय कार्यकर्ते, भूम.
शासनाचे नुकसान, जनतेवर भुर्दंड
ग्रामपंचायतींनी बसवलेले पथदिवे दिवसरात्र चालु रहात असल्याने विजेचा अपव्यय होत आहे. यामुळे शासनाने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परंतु याचा भुर्दंड सर्वसामान्य जनतेवर पडत आहे. - प्रल्हाद आडागळे, - विधानसभा प्रमुख, युवासेना.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.