आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्याला ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचा वारसा लाभला आहे. त्यामुळे हा भाग पर्यटकांसाठी वरदान ठरत आहे. पुरातन भुईकोट किल्ला, डोमगाव येथील सर्व बाजुंनी पाण्याने वेढलेले श्री कल्याणस्वामी यांचे समाधी मंदिर आदी ठिकाणी राज्यासह परराज्यातून भाविक-भक्त तसेच पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. येथे सुविधा उपलब्ध झाल्यास युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. तसेच यामुळे तालुक्यातील अर्थकारणाला गती येऊन विकासात भर पडू शकते. तालुक्यातील सीना-कोळेगाव प्रकल्प, हंसराज स्वामी, प्रज्ञानंद स्वामी, अनंतदास स्वामी यांची समाधी असलेला मठ, श्रीक्षेत्र सोनारी येथील श्रीकाळ भैरवनाथ, जोगेश्वरी मंदिर आदी ठिकाणी राज्यासह परराज्यातून भाविक व पर्यटक मोठ्या प्रमाणात दर्शन व पर्यटनासाठी येतात. परंतु पर्यटकांना निवास व हॉटेलिंगची सुविधा उपलब्ध नाही, त्यामुळे सर्वजण धावती भेट देऊन परततात. तालुक्यात पर्यटकांना पाहण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. परंडा तालुका महाराष्ट्रात पर्यटनाच्या नकाशावर येण्यासाठी पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी तीर्थक्षेत्राचा दर्जा व पर्यटन स्थळांच्या विकासासाठी निधीची तरतूद करणे आवश्यक आहे. कारण तालुक्यातील एेतिहिसिक व धार्मिक स्थळांचा पाहिजे तसा विकास झालेला नाही.
सोनारी यात्रेत येतात हजारो भाविक
श्रीक्षेत्र सोनारी येथे श्रीकाळ भैरवनाथ जोगेश्वरी मंदिर आहे. चैत्र महिन्यात येथे मोठा रथोत्सव व यात्रा भरते. राज्यासह परराज्यातील लाखो भाविक दर्शनासाठी येतात. तसेच राजकीय नेते मंडळींचे कुलदैवत असल्याने येथे अनेक मंत्री, आमदार, खासदार दर्शन घेण्यासाठी येतात. परंतु अपेक्षित विकास झालेला नाही. त्यामुळे अनेक भाविक-भक्त दर्शन घेऊन परतीचा मार्ग धरतात.
६३ तोफा, २६ बुरुजांचे आकर्षण
भुईकोट किल्ल्याच्या संवर्धनासाठी पाच वर्षांपूर्वी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे पुरातत्व विभागाकडून चार कोटी ४० लाख रुपयांचा निधी मिळाला. पूर्वीचा बाज कायम ठेवून बांधकाम व डागडुजीचे काम करण्यात आले. त्यामुळे किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढणार आहे. किल्ल्याची तटबंदी भक्कम असुन २६ बुरुज आहेत. या बुरुजांवर पंचधातूत व इतर धातूंच्या लहान-मोठ्या ६३ तोफा पहावयास मिळतात.
डोमगावात हवी बोटिंगची सुविधा
डोमगाव येथील श्रीराम मंदिर चोहोबाजूंनी पाण्याने वेढलेले आहे. येथे समर्थ रामदास स्वामी यांचे शिष्य श्री कल्याणस्वामी यांची वाळूची समाधी आहे. दास बोधाची मूळप्रत या ठिकाणी पहावयास मिळते. सीना-कोळेगाव प्रकल्पात मुबलक पाणी आहे. त्यामुळे पर्यटकांना येथे पोहोचण्यासाठी बोटिंगची सुविधा केल्यास पर्यटकांत वाढ होऊन हॉटेल व इतर व्यवसायाला ऊर्जा मिळू शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.