आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील मध्यवर्ती परिसरात राष्ट्रीय महामार्ग, बसस्थानक, मुख्य बाजारपेठ, आरोग्य नगर, महादेव रोड, पतंगे रोड व शासकीय कार्यालय परिसरात पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे संपूर्ण शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. बेशिस्त वाहनांनी शहरातील मुख्य रस्ते गिळंकृत केले आहेत.
दरवर्षी हजारो नवीन वाहनांची भर शहरात पडत असताना त्या तुलनेत रस्ते व पार्किंगसाठी नियोजन केले जात नाही. त्यामुळे अवघ्या काही वर्षांत पार्किंगअभावी बेशिस्त वाहतुकीचे संकट उभे ठाकले आहे. शहरात मुख्य बाजारपेठ व याच भागातील सोनार गल्ली, इंदिरा चौक, महादेव रोड हा पार्किंग समस्येचा धोकादायक झोन बनला आहे. राष्ट्रीय महामार्गावर बसस्थानकापासून तहसील कार्यालयापर्यंतच्या रस्त्यावर हजारो नागरिक कामानिमित्त दररोज येत असतात. शहरात पार्किंगची जागाच नसल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला तर महादेव रोडला अर्ध्या रस्त्यावर बेशिस्त वाहनांमुळे ४० फुटांचा रस्ता ३० फूट गिळंकृत झाला आहे. त्यामुळे वाहतूक व थांबलेल्या वाहनांमधून पायी वाट काढणे बिकट झाले आहे. शहरातील अनेक महत्वाच्या रस्त्यावर दिवसभर हजारो लहान-मोठी वाहने उभी असतात.
त्यामुळे रस्त्यावरून वाहने चालवताना नव्हे तर पायी चालतानाही जीव मुठीत घेऊन चालावे लागते. सायंकाळी या भागात वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे. हा प्रकार शहरातील सर्वच भागात घडत आहे. मागील काही वर्षात मुख्य बाजारपेठेत व्यापारी, पालिकेच्या माध्यमातून वाहतूक सुरळीत करण्यासाठी दिवसाआड पार्किंग क्षेत्र निश्चित करत बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु रस्त्यावर बेशिस्त वाहने लागलेली असतात. त्याचा मनस्ताप पादचाऱ्यांसह नागरिकांना सहन करावा लागत आहे.
शहराचा विस्तार वाढला
शहराचा मागील पाच वर्षांत झपाट्याने विस्तार झाला आहे. वाहनांचे प्रमाणही वाढले. ऑटोरिक्षांची संख्याही हजारावर आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या रिक्षा, दुचाकी, प्रवासी वाहतूक वाहनांची त्यात अतिरिक्त भर पडत आहे. परंतु शहरातील रस्ते होते तेवढेच राहिले. शहरात मोठाली संकुले तयार झाली, परंतु पार्किंगचे नियोजन झाले नाही. त्यामुळे पार्किंगचा प्रश्न जटील झाला आहे. शहरात मुख्य रस्ते व अंतर्गत रस्ते ४० टक्के पार्किंगसाठी लागणाऱ्या वाहनांनी व्यापल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. शहरात दिवसेंदिवस गंभीर होणारी पार्किंग समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे. पोलिसांनी बेशिस्त वाहनधारकांकडून दंड घेण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून मार्गदर्शन करत वाहनधारकांना सामजिक जाणिवेचे भान करून देण्याची गरज आहे. शहरात मुख्य रस्त्यांवर ‘पी १’ व ‘पी २’ अशी पार्किंगची योजना पालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त मोहिमेतून राबवावी. शहरातील वर्दळीचे काही रस्ते वन-वे करावेत व त्यांची काटेकोर अंमलबाजवणी करावी. शिवाय नागरिकांची मानसिकता बदलणेही गरजेचे आहे.
उपाययोजना केवळ नावापुरत्या
शहरात पार्किंगची समस्या सोडवल्याशिवाय वाहतुकीचा प्रश्न मिटणार नाही. पालिका प्रशासनाने पार्किंगचे नियोजन करावे. सम- विषम दिवसांचे नियोजन करत पार्किंगसाठी जागा निश्चित करण्याचा निर्णय झाला होता. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. पालिकेला नवीन जागा घेणे शक्य नसल्याने उपलब्ध जागी नियोजन करून वाहनांना शिस्तीत लावणे आवश्यक झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.