आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपेक्षा:नववर्षात मंत्री डॉ. सावंत यांच्याकडून आरोग्य सुविधेच्या बळकटीकरणाची अपेक्षा

वाशीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मागास जिल्ह्यातील मागास तालुका म्हणून वाशी तालुक्याची ओळख पुसण्यासाठी नवीन वर्षात मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून तालुक्यातील नागरिकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. तसेच वाशी शहरासह तालुक्यातील जुन्याच परंतु मोडखळीस आलेल्या मूलभूत सुविधा बळकट करण्याची गरज आहे.

वाशी तालुक्याच्या निर्मितीपासून नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे विकास न झाल्याने २५ वर्षानंतरही नागरिकांना पूर्वीच्याच तोकड्या सुविधांचा वापर करावा लागत आहे. यामध्ये येथील आरोग्य सेवा सुधारणे आवश्यक आहे. येथील रुग्णालयात बीड जिल्ह्यातील नागरिक उपचारासाठी येतात.

यामुळे ३० खाटा व अपूऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आरोग्य सेवा व्यवस्थित मिळत नाहीत. वाढीव खाटांना मंजुरी आली नसली तरी त्याची अंमलबजावणी तत्काळ होणे गरजेचे आहे. तसेच रुग्णालयातील डॉक्टर आपल्या मर्जीनुसार सेवा देतात. यामुळे रुग्णांना ताटकळत बसून खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. डॉक्टर व कर्मचाऱ्यांना वेळेत व नियमानुसार सेवा देण्यास बंधने घालणे गरजेचे आहे. सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा युनिट लवकर उभारणे गरजेची आहे. तसेच शेतकऱ्यांना विमा, अनुदान, नुकसान भरपाई मिळताना नेहमी शेवटचे स्थान मिळते.

महसूल अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित राहावे लागत आहे. तसेच शेतकऱ्यांना पुरेसा वीज पुरवठा उपलब्ध करण्याची गरज आहे. सध्या २४ तासांपैकी केवळ ४ तासही वीज मिळत नाही. यामध्ये अनेकवेळा घोटाळा, कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी २२० केव्हीए केंद्र उभारणी गरजेची आहे.

शेतात, शहरात गावोगावी लोंबकळणाऱ्या तारा, तुटलेले खांब, उघडे बोर्ड हे सातत्याने मोठ्या अपघाताचे संकेत देत आहेत. विजेच्या समस्येबरोबरच तालुक्यातील अपवाद वगळता सर्वच रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. यामुळे दळणवळणाला गती येत नाही. वाशी येथे बसस्थानक नावालाच आहे. सुविधा नसल्याने वाशी शहरात अद्याप मोठी बाजारपेठ निर्माण झालेली नाही.

यामुळे येथील तरुणांना रोजगार उपलब्ध नाही. तसेच ६० हजार ग्राहकांसाठी एक राष्ट्रीयकृत बँक व सहा कर्मचारी आहेत. यामुळे दिवसभर बँकेच्या दारात रांगा लागतात. मुलभूत सुविधा अन् रोजगार नसल्याने येथील तरुण शहराकडे स्थलांतरीत करण्याचे प्रमाण अधिक आहे. तालुक्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधांना आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी बळकटी देण्याची अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. राज्याच्या सत्तेमध्ये मतदार संघाला व वाशी तालुक्याला प्रथमच कॅबिनेट मंत्रिपद प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या माध्यमातून मिळाले आहे.

आश्वासनांच्या पूर्तीकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष
मंत्री डाॅ. सावंत यांच्या कामाची चुणूक युती सरकारच्या काळात मिळालेल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात नागरिकांनी मिळाली होती. यामुळे मतदारांनी पुन्हा पसंती दिली. त्याचे विकासात रुपांतर व्हावे, अशी आशा नागरिकांच्या मनात आहे. डॉ. सावंत आरोग्य मंत्री असल्याने आरोग्य सेवा सर्वोत्तम होणे अपेक्षित आहे. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी विजेची समस्या, एमआयडीसी, खवा क्लस्टर, रस्ते आदी सुविधा सर्वोत्तम करून देण्याचा शब्द दिलेला आहे, तो नवीन वर्षात पूर्णत्वाकडे नेण्याची अपेक्षा नागरिकांना लागली आहे.

बातम्या आणखी आहेत...