आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांचा नकार:आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यात शिक्षणाचा खेळखंडोबा ; शिक्षकांची 93 पदे रिक्त

संग्रामपूर / सागर कापसेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यात गट शिक्षणाधिकारी व शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांसह सहायक शिक्षकांची तब्बल ९३ पदे रिक्त असून एवढ्या मोठ्या संख्येने रिक्त पदे असल्यामुळे तालुक्यात शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी तेरा शिक्षकांची तात्पुरती नियुक्ती केली. परंतु या आदेशाला शिक्षकांनी केराची टोपली दाखवत संबंधित शाळेवर रूजू होण्यास चक्क नकारघंटा दिला आहे. त्यामुळे दोन दोन वर्ग चालवण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांच्या तातडीने रिक्त जागा भरण्यात याव्यात, अशी मागणी पालक करत आहेत.

संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, यासाठी गावागावात शिक्षणाचे दालन उभे करण्यात आले आहे. परंतु मागील काही वर्षांपासून शिक्षण विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. हे ग्रहण सोडण्यास अद्यापही एकाही अधिकारी किंवा लोकप्रतिनिधीला यश आले नाही. त्यामुळे तालुक्यात शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. तालुक्यात गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, मुख्यध्यापक, केंद्र प्रमुख यांच्यासह सहाय्यक शिक्षकांची ९३ पदे रिक्त असल्याने आदिवासी, गरीब शेतकरी, शेतमजुरांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षकांसाठी तालुक्यातील पालकांनी आंदोलनदेखील केले होते.

या आंदोलनाची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये शिक्षणाधिकाऱ्यांनी तेरा शिक्षकांची तात्पुरती नियुक्ती केली होती. परंतु या आदेशाला केराची टोपली दाखवत एकही शिक्षक संबधित शाळेवर रुजू झाला नाही. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार असलेल्या व मनमानीचा कळस गाठणाऱ्या शिक्षकांकडे वरिष्ठ अधिकारी डोळेझाक करत असल्याचे दिसून येत आहे. यावरुन संबंधीत शिक्षकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे काय?, नियुक्ती केलेल्या शिक्षकांना रूजू होण्यासाठी मुहूर्त केव्हा मिळणार?, असा प्रश्न पालकांना पडला आहे. शिक्षणाधिकारी पागोरे यांनी शिक्षण विभागातील रिक्त जागा तातडीने भरव्यात, अशी मागणी पालक करत आहेत.

शिक्षक भरती प्रक्रिया लवकर सुरु करावी
शेतकरी शेतमजुरांची बहुतांश मुले जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचे धडे घेत आहेत. परंतु शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासन स्तरावर भरती प्रक्रिया सुरु करुन शिक्षकांची रिक्त पदे लवकर भरण्यात यावी. किंवा स्थानिक स्तरावरील होतकरु गरजू, शैक्षणिक पात्रता असलेल्या युवकांची मानधन तत्वावर नियुक्तीचे आदेश शिक्षण विभागाने द्यावे.
-राजेंद्र वानखडे, काँग्रेस तालुकाध्यक्ष

शिक्षकांची रिक्त पदे भरा अन्यथा आंदोलन
संग्रामपूर आदिवासी बहुल तालुका असल्याने कर्मचारी, अधिकारी शिक्षा समजतात. अधिकारी आमिषाला बळी पडून अधिकारी व कर्मचाऱ्यांना मर्जीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश देतात. त्यामुळे शिक्षण विभागातील रिक्त पदे भरण्यास विलंब होत आहे. रिक्त पदे भरण्यासाठी आ. डॉ. संजय कुटे यांनी शिक्षणाधिकाऱ्यास समज देऊन कानउघाडणी केली तर शासनस्तरावर शिक्षकांची रिक्त पदे भरली जातील. विनाविलंब रिक्त पदे न भरल्यास भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.
-लोकेश राठी, भाजप तालुकाध्यक्ष

बातम्या आणखी आहेत...