आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगरपरिषदेत भंगार चोरी प्रकरणात थेट मुख्याधिकाऱ्यांसह उपमुख्याधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. प्रशासन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे. यातील दोषींची माहिती असूनही पोलिसांत तक्रार दाखल केली नाही. वेळ काढून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा नवनियुक्त राज्य कार्यकारिणी सदस्य अजित खोत यांनी पत्रकार परिषदेत केला.
ते म्हणाले की, २३ आणि २४ जुलै दरम्यान नगरपरिषदेत भंगार चोरी झाली. यात दोषी कर्मचारी विलास गोरे यांची वेतनवाढ रोखून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच एका भंगार चाेरणाऱ्यांकडून २५ हजार रुपये वसूल केले. या प्रकरणाची चौकशी आठ दिवसात करण्याचे सांगत वेळ वाया घालवत पुरावे नष्ट केले. चौकशी करुनही पोलिसांत तक्रार दाखल करताना ‘अज्ञात चोरट्यांनी’, म्हणून गुन्हा नोंदवला. कचरा वर्गीकरण करण्याचे यंत्रही गायब आहे. तसेच ८० ते ८५ लाख रुपयांचे साहित्य चोरी झाले असताना प्रशासनाने केवळ १३ हजार ५० रुपये किंमतीचे साहित्य चोरी झाल्याचे पोलिस तक्रारीत म्हटले आहे. विशेष म्हणजे ‘आप’च्या वतीने आनंदनगर पोलिस ठाण्यात ‘आम्ही मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी, गोरे आणि अन्य कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली.
त्याची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे सोमवारी पोलिस अधीक्षकांना भेटून नगरपरिषद प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत. न्यायालयातही याचिका दाखल करत असून पोलिस महासंचालकांनाही भेटणार असल्याचे खोत यांनी सांगितले. यावेळी जिल्हा सचिव मुन्ना शेख, कोषाध्यक्ष विकास वाघमारे, तालुकाध्यक्ष राहूल माकोडे उपस्थित होते. यासंबंधी मुख्याधिकाऱ्यांना संपर्क केला असता, दुपारी त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.