आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसोय:रुग्णवाहिका औषध नेण्यासाठी वापरल्यामुळे रुग्णांची गैरसोय

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका औषध नेण्यासाठी वापरल्या जात असल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. बुधवारी बहुतांश रुग्णवाहिका जिल्हा परिषदेच्या आवारात दिवसभर थांबून होत्या.

जिल्हा परिषद मुख्यालयाच्या बाजूलाच प्राथमिक आरोग्य केंद्रांचे मुख्य औषध भांडार आहे. येथून औषधे नेण्यासाठी शक्यतो रुग्णवाहिकांचा उपयोग केला जातो. यासाठी जिल्ह्यातील दूरवरील गावातून रुग्णवाहिका येथे सातत्याने येत असतात. या रुग्णवाहिका दिवसभर जिल्हा परिषदेच्या आवारात थांबलेल्या असतात. रुग्णवाहिकेचे काही चालक शहरात खासगी कामे करत फिरतात. परिणामी ग्रामीण भागातील अडलेल्या रुग्णाला ऐनवेळी रुग्णवाहिका न मिळण्याचे अनेक प्रसंग घडत आहेत. यामुळे या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मोठी गैरसोय सहन करावी लागते.

भरमसाठ रक्कम भरून खाजगी वाहनाने रुग्ण रुग्णालयात न्यावा लागतो. अनेक वेळा जिल्हा परिषद मुख्यालयात जिल्हा आरोग्य अधिकारी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करत असतात. संबंधित वैद्यकीय अधिकारी सुद्धा रुग्णवाहिका घेऊनच जिल्ह्याच्या ठिकाणी येतात. यामुळेही रुग्णांची गैरसोय होते.

औषधे नेण्यासाठी व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रवासासाठी रुग्णवाहिका न वापरता वेगळ्या वाहनाची तरतूद करण्याची गरज आहे. अशी व्यवस्था झाली तर किमान ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकेल. बुधवारी जि.प.आवारात एकाच वेळी १५ पेक्षा अधिक रुग्णवाहिका थांबलेल्या होत्या. यामुळे जि.प. मुख्यालयाला एका मोठ्या रुग्णालयाचे स्वरूप प्राप्त झाले होते. जिल्हा परिषदमध्ये येणारे सर्व नागरिक याची चर्चा करत होते.

पर्यायी व्यवस्था करण्यास सांगणार
संबंधित वैद्यकीय अधिकारी व औषधे घेण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना रुग्णवाहिका न आणता पर्यायी वाहन उपलब्ध करून येण्यास सांगण्यात येईल. यासंदर्भात काटेकोरपणे दक्षता घेण्यात येईल.-डॉ. नितीन बोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी.

बातम्या आणखी आहेत...