आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:ग्लिरिसिडिया लावत आधी वाढवले जंगल क्षेत्र; आता नामशेष करण्याची तयारी, म्हणे वनस्पती विषारी

उस्मानाबाद / चंद्रसेन देशमुख6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या ३० वर्षांत वनक्षेत्रात ग्लिरिसिडिया वनस्पतीची झालेली लागवड पर्यावरणाला हानिकारक, प्राण्यांसाठी विषारी असल्याचे सांगत आता याला नामशेष करण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने दरवर्षी ही वनस्पती काढून त्या जागी वड, पिंपळ, कडुनिंब, कांचन, शिरस, जांभूळ, आवळा, बांबू आदी देशी झाडांची लागवड केली जाईल. दरम्यान, लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यात १२ हजार एकरांवर ग्लिरिसिडियाचे क्षेत्र असून आतापर्यंत शेकडो एकरांवरील ग्लिरिसिडिया काढून टाकण्यात आली. लवकरच अन्य जिल्ह्यांत हे काम सुरू होईल.

राज्यातील वनक्षेत्रात गेल्या ३० वर्षांत ग्लिरिसिडियाची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली. विशेषत: मराठवाड्यात नांदेड वगळता अन्य जिल्ह्यांत ग्लिरिसिडियाची लागवड सर्वाधिक आहे. मात्र, ग्लिरिसिडीयामुळे वन विभागालाच बाधा पोहोचत असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले. २००८ मध्ये महाराष्ट्रातील जंगलांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ग्लिरिसिडियाचे क्षेत्र व त्यासंबंधीचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसाा येणाऱ्या १० वर्षांत ग्लिरिसिडिया संपुष्टात आणण्यासाठी वर्किंग प्लॅन तयार करण्यात आला. ३० सप्टेंबर २०१९ रोजी या वर्किंग प्लॅनला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली. दरवर्षी तशी परवानगी घ्यावी लागते. या प्लॅननुसार ग्लिरिसिडिया खोदून काढण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी राज्य सरकारने बजेटही मंजूर केले आहे. २०१९-२० व २०२०-२१ या वर्षात लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात २१० हेक्टर म्हणजे ५२५ एकर ग्लिरिसिडिया काढून टाकून त्या जागी अन्य देशी वनस्पतींची लागवड केली आहे. ग्लिरिसिडियाची कापणीसाठी गावस्तरावरील संयुक्त वन व्यवस्थापन समितीची मदत घेतली जात आहे.

हातलाई डोंगर ओसाड होणार
थेट जंगलतोड होत असल्याने वन विभागाला यासाठी दरवर्षी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागते. दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यातील हातलाई डोंगराचा हिरवागार झालेला परिसर आता वृक्ष कापणीनंतर ओसाड होणार आहे. - प्रा. मनोज डोलारे, पर्यावरणप्रेमी, उस्मानाबाद.

पर्यावरणाला पूरक झाडांची लागवड करणार आहोत
ग्लिरिसिडिया पर्यावरणाला फायदा होत नसल्याने ही वनस्पती काढली जात आहे. आता वन विभागामार्फत देशी वनस्पतीची लागवड करण्याचे शासनाचे नियोजन आहे. पशु-पक्ष्यांना लाभदायक ठरणारी देशी झाडे लावून मूळ जैवविविधता आणण्याचा उद्देश आहे. - एम.आर.गायकर, विभागीय वन अधिकारी,उस्मानाबाद विभाग.

असा आहे ग्लिरिसिडियाचा इतिहास
उन्हाळ्यात पानगळ होणारा आणि पावसाळ्यात नैसर्गिकपणे फुलून येणारा ग्लिरिसिडिया मूळचा मध्य अमेरिकेतला.

- ग्लिरिसिडिया वनस्पती नेमकी काय?
ग्लिरिसिडिया वनस्पतीची देशातील उष्ण प्रदेशात मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. कमी पाण्यावर वाढणारी ही वनस्पती अत्यंत जलदगतीने वाढणारी, मध्यम उंची आणि बुंध्यापासून अनेक फांद्या फुटणारी आहे. यातील बिया आणि सालीमध्ये उंदीरनाशक विषारी द्रव्य असते. पाने विषारी असल्यामुळे जनावरेही खात नाहीत.

- या वनस्पतीचा काय होतो दुष्परिणाम?
हिवाळ्यात पानगळ झाल्यानंतर ग्लिरिसिडिया फुलांच्या गुच्छांनी बहरून जातो. छाटणीनंतर अत्यंत झपाट्याने नवे धुमारे फुटून वनस्पतीची वाढ होते. आपल्या देशात ग्लिरिसिडियाची लागवड वन विभागाच्या विशेषत: डोंगराळ भागात झाली. खडकाळ जागेत माती तयार होण्यासाठी १०० ते १५० वर्षे लागतात, त्यामुळे ग्लिरिसिडियाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. या वनस्पतीच्या पाल्यामध्ये मुबलक प्रमाणात नत्र असते. त्यामुळे शेती भुसभुशीत होते. आता या ठिकाणी देशी झाडे चांगल्या पद्धतीने वाढू शकतात.

- वनक्षेत्राचे नुकसान होऊ शकते का?
लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात १४ हजार ६६९ चौ.किमी एकूण क्षेत्र आहे. त्यापैकी ०.८७ टक्के वनक्षेत्र आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात ७ हजार ५१२ चौ.किमी (१.०१ टक्के) व लातूर जिल्ह्यात ७ हजार १५७ चौ.किमी (०.७३ टक्के) एकूण क्षेत्र आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात १५४ तर लातूर जिल्ह्यात १७४ गावांत वनक्षेत्र आहे. ग्लिरिसिडियाची संपूर्ण कापणी झाल्यानंतर सुमारे ५० टक्क्यांनी दोन्ही जिल्ह्यांचे वनक्षेत्र कमी होणार आहे. उस्मानाबादेत हातलाई डोंगर परिसर आता ओसाड होणार आहे.

12 हजार एकरवर लातूर, उस्मानाबादेत ग्लिरिसिडियाचे क्षेत्र 10 वर्षांचा ग्लिरिसिडिया काढण्याचा १० वर्षांचा मेगाप्लॅन - मराठीत त्याला गिरिपुष्पही म्हणतात. १९१६ मध्ये मंुबईत ग्लिरिसिडियाची पहिल्यांदा लागवड झाली - गिरिपुष्प नावाच्या वनस्पतीचा पुराणातही उल्लेख आढळतो. - ग्लिरिसिडिया वनस्पतीचे शास्त्रातील नाव ग्लिरीस म्हणजे उंदीर व सिडो म्हणजे मारक अशा दोन शब्दांनी बनवले आहे.

बातम्या आणखी आहेत...