आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा:उस्मानाबादेत इनडोअर खो-खो चे सामने; राष्ट्रीय स्पर्धांत देशातील पहिलाच प्रयोग

उस्मानाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात प्रथमच खो-खो स्पर्धेसाठी इनडोअर सामन्यांचा प्रयोग उस्मानाबाद येथे आयोजित राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत केला जाणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन रविवारी सायंकाळी पाचला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. आशिया व जागतिक दर्जाच्या स्पर्धांसाठी देशाचा संघ निवडीची प्रक्रिया याच स्पर्धेत होणार आहे, अशी माहिती भारतीय खो-खो महासंघाचे महासचिव प्रा. डॉ. चंद्रजित जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेत महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सेक्रेटरी अॅड. गोविंद शर्मा, जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण बागल, संयोजन समितीचे रहमान काझी, संयोजन समितीतील संदिप साळुंके, सुनील बनसोडे, अण्णा पाटील, पदाधिकारी उपस्थित होते. जाधव म्हणाले की, स्पर्धेसाठी मातीची तीन व मॅटची दोन मैदाने तयार केली. एक इनडोअर मैदानही साकारले. या मैदानावरही काही सामने खेळवले जातील. इनडोअर खो-खोचे सामने घेण्याचा देशातील पहिलाच प्रयोग उस्मानाबादेतील राष्ट्रीय स्पर्धेत होणार आहे.

स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष व राज्य खो-खो असोसिएशनचे माजी अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनसाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित केले. स्पर्धेत पुरुष गटात ३६ संघ तर महिला गटात ३४ संघ असे सर्व मिळून १५०० खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेत २५० सामने खेळवले जाणार आहेत.

स्पर्धेतील महत्त्वाचे मुद्दे
आतापर्यंत उस्मानाबादेत राज्यस्तरीय व निमंंत्रित राज्य संघाची झाली होती स्पर्धा.
यानिमित्त अनेक पुरस्कार प्राप्त खेळाडू उस्मानाबादेत येत असल्याने स्वागत.
एका पुरुष खेळाडूला एकलव्य आणि महिला खेळाडूला राणी लक्ष्मीबाई राष्ट्रीय पुरस्कार.
शिवछत्रपती पुरस्कार विजेते खोगरे यांचा गुरुवर्य पुरस्काराने होणार सन्मान.
पुरस्कार प्राप्त खेळाडूंची प्रेक्षक गॅलरीला नावे देण्यात आली आल्यामुळे ओळख.
जिल्ह्यातील पुरस्कारप्राप्त खेळाडू, क्रीडा प्रशिक्षकांचा स्पर्धेदरम्यान सत्कार.
सकाळ, सायंकाळच्या सत्रात स्पर्धा.

६५ लाखांचा खर्च
स्पर्धेच्या तयारीसाठी ६५ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. यातून मैदानाची देखभाल, निवास, भोजन व्यवस्थेसह १५ हजार प्रेक्षकांना बसता येईल, अशी गॅलरी उभारणे, प्रकाश व्यवस्था आदी कामे करण्यात आली आहेत. यापेक्षा अधिक खर्च आवश्यक असेल तर त्याचीही तरतूद करण्यात आली असल्याचे जाधव यांनी सांगितले.

पाहुण्या संघाचाही सहभाग
स्पर्धेत प्रत्येक राज्याचे प्रतिनिधीत्व करणारे संघ असतीलच. पाहुणे संघ म्हणून एअरपोर्ट अथॉरिटी, इंडो तिबेट बॉर्डर पोलिस, इंडियन रेल्वे, बॉर्डर सेक्युरिटी फोर्स, ऑल इंडिया पोलिस फोर्स कंट्रोल बोर्ड या संघांचा सहभाग असणार आहे. आतापर्यंत निम्म्यापेक्षा अधिक संघ दाखल झाले आहेत. काही संघ मध्यरात्रीनंतर पोहोचणार आहेत. सर्वांच्या निवासासाठी ३५० पेक्षा अधिक लॉजमधील व मंगलकार्यालयातील खोल्या बुक करण्यात आल्या आहेत.

मोजक्याच आमदारांचे फोटो
मंचाच्या बाजुला आमदार राणाजगजितसिंह पाटील, कैलास पाटील यांच्यासह जिल्ह्याबाहेरील काही आमदारांचे फोटो आहेत. मात्र, पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यासह अन्य आमदार व खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकरांच्या फोटोला स्थान देण्यात आले नाही. यासंदर्भात प्रा. डॉ. जाधव यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, असे प्रत्येकांचे फोटो लावायचे म्हटले तर मैदान पुरणार नाही. केवळ मदत करणाऱ्यांचेच फोटो लावण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...