आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वप्नांचा चिखल:पाचशे हेक्टरवरील टोमॅटोवर करपा, तूट अळीचा प्रादुर्भाव; उत्पन्न निम्म्याने घटले

बाळासाहेब माने | उस्मानाबाद2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिवृष्टी व सततच्या ढगाळ वातावरणामुळे टोमॅटोवर ओला करपा अन् तुट अळीचा प्रादुर्भाव झाल्याने ९७८ हेक्टर लागवड क्षेत्रापैकी ५०० हेक्टरवरील टोमॅटोचे नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्याला एकरी २० टनाचा माल निघतो, त्या प्लॉटमध्ये उत्पन्न घटून दर्जाहीन माल निघत आहे. डागाळलेल्या टोमॅटोला अत्यंत कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल झाला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या काही भाजीपाल्याची आवक वाढल्याने दर कमी झाले आहेत. मात्र, टोमॅटो, फुलकोबी, पान कोबीचा दर्जा घसरल्याने दर कमी झाले. यंदा जून महिन्यापासून सर्वाधिक काळ ढगाळ वातावरण राहिले आहे. तसेच सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात अनेक वेळा अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात कृषी विभागाने ९७८ हेक्टर क्षेत्र टोमॅटोसाठी संरक्षित केले असून अंदाजित १५,७४,५८० किलो उत्पादन अपेक्षित आहे. मात्र, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे ५०० हेक्टरवरील टोमॅटोवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. उद. उस्मानाबाद तालुक्यातील गावसुत येथील लांडगे यांचेही टोमॅटोच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल आहे. भूम तालुक्यातील सावरगाव दरेवाडीतील शिवानंद भोसले यांनी एक एकर टोमॅटो लागवड केली असून रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सध्या दोन तोडणी झाल्या असून आगामी काळात प्लॉट जोपासण्यासाठी मोठा खर्च लागणार असल्याचे सांगितले.

तसेच परंडा तालुक्यातील गौतम शिंदे यांनी अर्धा एकर टोमॅटोची लागवड केली होती. मात्र, रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन घटल्याचे सांगितले. तात्याराम फुटाणे यांनीही एक एकर टोमॅटोची लागवड केली होती. मात्र, ओला कर्पा व तुट अळीमुळे उत्पन्न घटले व काही प्रमाणात निघालेला माल दर्जाहीन असल्याने अत्यंत कमी दर मिळाल्याचे सांगितले.

यासह जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कीटकनाशकाची फवारणी करून पीक जोपासण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिक काळ ढगाळ वातावरण राहिल्याने टोमॅटोवर ओला कर्पा व तुट अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. ओला कर्पा रोगामुळे टोमॅटोवर काळे डाग निर्माण होतात तर तुट अळी टोमॅटोला पोखरून खाते. यामुळे टोमॅटो खराब होऊन नुकसान होते. यात उत्पन्नातही निम्म्याने घट होऊन मिळणारा माल दर्जाहीन असतो.

यामुळे बाजारपेठेत आवश्यक दर मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सध्या किरकोळ बाजारात ओला कर्पा डाग पडलेल्या टोमॅटोचे दर ५ ते १० रुपये किलो आहेत. मात्र, बाजार समितीत या मालाला केवळ २ ते ५ रुपये दर मिळतो. यातून शेतकऱ्यांचे वाहनाचे भाडेही निघत नाही. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

तुट अळीमुळे उत्पन्नात मोठी घट
अतिरिक्त पावसामुळे ओला करपा तर सततच्या ढगाळ वातावरणामुळे टोमॅटोवर तुट अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. तुट अळीने टोमॅटो पोखरल्यामुळे गळून पडतात. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न निम्म्याने घटून आर्थिक फटका बसतो. एकरी जवळपास एक लाख रुपयांचा खर्च येतो. शासनाने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनाही मदत देण्याची गरज आहे.-तात्याराम फुटाणे, शेतकरी.

एक एकरला ६० ते ९० हजाराचा होतो खर्च
ज्या शेतकऱ्याला एक एकरमध्ये २० टन माल निघतो, त्या शेतकऱ्यांना रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने केवळ १० टन दर्जाहीन माल मिळाला. यामुळे चांगला भाव मिळत नाही. एक एकर टोमॅटो लागवड करून बाजारात विक्री करण्यापर्यंत एकरी जवळपास ६० ते ९० हजार रुपये खर्च येतो. कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव न झाल्यास शेतकऱ्यांना प्रति किलो १० रुपये भाव मिळाला तरी दीड लाख ते १ लाख ८० हजार रुपयाचे उत्पन्न मिळते.

रोग प्रतिबंधासाठी बुरशीनाशक, निंबोळी अर्क, गोमूत्राची फवारणी करावी
ढगाळ वातावरण आणि अतिवृष्टीमुळे टोमॅटोच्या झाडावर ओला करपा व तुट अळीचा प्रादुर्भाव होतो. शेतकऱ्यांनी वातावरणाचा अंदाज घेऊन बुरशीनाशक, निंबोळी अर्क, गोमुत्र, दशपर्णी अर्काची फवारणी करावी. यामुळे टोमॅटोवर डाग पडणार नाही तसेच अळीचा प्रादुर्भाव सुद्धा होणार नाही.-श्रीकांत देशमुख, कृषी सहाय्यक, भूम.

बातम्या आणखी आहेत...