आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोगेश्वर मंदिर:अभ्यासक कृष्णा गुडदे यांनी दिली माहिती

उमरगा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुक्यात नारंगवाडी जुन्या गावात प्राचीनकालीन हेमाडपंथी बांधणी करण्यात आलेले भोगेश्वर मंदिर आहे. या मंदिरात शिलालेख असून याचे वाचन शिलालेख अभ्यासक कृष्णा गुडदे यांनी नुकतेच केले आहे.

उत्तर चालुक्य कालीन राजे म्हणजेच बसवकल्याण पूर्वीचे नाव कल्याणीचे चालुक्य यांचे नारंगवाडी गावावरती विशेष लक्ष होते. येथील मंदिर खुप सुंदर व रेखीव आहे. नंदी मंडप सभामंडप, अंतराळ, गर्भगृह अशी या मंदिराची रेखीव रचना आहे. नंदी देवाकडे तोंड करून मंडपात बसले आहेत. असे नंदी मंडप रचना खूपच कमी मंदिरात शिल्लक आहे. नंदी मंडपात राशीचक्र शिल्प आहे. नंदी मंडपाला जाल वातायन (झरोके) आहेत. त्यातून एका विशिष्ट दिवशी म्हणजे नविन वर्षी गुढीपाडव्याचा दिवशी सकाळची सूर्य किरणे देवाच्या पिंडीवर पडतात.या नंदी मंडपावर जुन्या कानडी लिपी अन भाषेतील १८ ओळींचा शिलालेख असून दुसरा शिलालेख हे सभामंडपाच्या भिंतीवर ५२ ओळींचा कानडी शिलालेख आहे.

या दोन्ही व सभामंडपाच्या चार देवकोष्टकांतील मूर्ती सुंदर, रेखीव व चांगल्या अवस्थेत आहेत. विशेष म्हणजे मंदिर निर्मिती वेळी स्थापन केलेल्या आहेत. देवाच्या गर्भगृहात जातानाच्या द्वारावर श्री गणपती कोरलेले असून गर्भगृहात शिवलिंग स्थापित आहे. कानडी भाषेतील शिलालेखात या देवतेचा उल्लेख भोगेश्वर म्हणून आला आहे.

बाजूच्या मारुती मंदिरात एक कन्नड शिलालेख आहे. तसेच अनेक विरगळ आहेत. या विरगळ वरून असे समजते की, गावाच्या वीरांनी लढाईत लढून मरण पत्करले आहेत. त्यानंतर आठवणीत ही त्यांची विरगळ रूपी स्मारके स्थापन केली गेली आहेत.त्याचे इतिहासातील महत्व अनन्य साधारण आहे. मंदिरावरील दोन शिलालेख आजही नव्याने कोरल्यासारखे वाटतात. जवळपास ९०० वर्ष होऊन ही ते खुप चांगल्या स्थितीत आहेत. ते मंदिरावर कोरले असल्याने त्यावर इतर बाबींचा परिणाम झालेला नाही किंवा ते इतरत्र हलवता आले नाहीत.

नंदी मंडपावरील शिलालेख १८ ओळींचा असून कल्याण चालुक्य राजा भूलोकमल्ल म्हणजेच तृतीय सोमेश्वर याच्या कारकीर्द मधील आहे. महापर्वकाळी व्यापारीकडून कर, मंदिराच्या गुरुवर्य यांच्याकडे लावून दिला आहे. तो भोगेश्वर देवाच्या धुपारती साठी दिला आहे. दान दिल्याची तारीख ४ ऑक्टोबर ११३० अशी येते. सभामंडपाच्या मोठा शिलालेख ५२ ओळींचा आहे. हा शिलालेख चालुक्य राजा भूलोकमल्ल म्हणजेच सोमेश्वर तिसरा याच्या चौथ्या राज्यवर्षीचा आहे. इ.स. २९ ऑक्टोबर ११२९ रोजी भोगेश्वराच्या मंदिराला महासामंत बोचरस याने काही करांतून मिळणारे उत्पन्न मंदिराचे आचार्य गुरुदेव यांच्याकडे देण्याचे ठरवून दिले होते असे यावरून दिसून येते.

ब्रह्मदेव आणि शेषशायी विष्णूची मूर्ती : सभामंडप मध्यभागी मुख्य चार स्तंभावर हा तोलला आहे. सभामंडपाच्या भिंतीपासून बाहेर आलेल्या शिळेच्या बैठकीवर सप्तमातृका पट्ट बसवलेला आहे. सभामंडपाच्या भिंतीत देवकोष्टके असून त्यांत विष्णू,गणपती, सूर्य, चंद्र या देवतांच्या रेखीव मूर्ती आहेत.तर चंद्र देवता मूर्ती असलेल्या कोष्टकावर कन्नड व देवनागरी दोन्ही लिपीत श्री चंद्र देवरू कोरले आहे. उजव्या देव कोष्टकात ब्रम्हदेव तर डाव्या देव कोष्टकात शेष शयनी विष्णू स्थानापन्न आहेत.

बातम्या आणखी आहेत...