आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकास आराखडा:तुळजापुरात सल्लागार कंपनीची पाहणी ; प्रथम भाविकांच्या सुविधेला प्राधान्य देण्याची मागणी

तुळजापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीर्थक्षेत्र तुळजापूरचा नव्याने विकास आराखडा तयार करण्यासंदर्भात सल्लागार कंपनी कामाला लागली आहे. मंगळवारी मंदिर परिसरासह घाटशीळ, रामदरा तलाव, शहरातील सर्व प्राचीन कुंड, मठांची पाहणी केली. यावेळी पुरातत्व विभाग, मंदिर संस्थानचे अभियंता आदींची उपस्थिती होती. दरम्यान विकास आराखड्यात सर्व प्रथम भाविकांच्या सुविधेला प्राधान्य देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी डाॅ. सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली तीर्थक्षेत्र तुळजापूरचा नवीन विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. या संदर्भात सोमवारी (दि. ३१) तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात दिवसभर चाललेल्या आढावा बैठकीत पुजारी मंडळ, महंत व नागरिकांकडून सुचना मागवण्यात आल्या. तसेच विकास संदर्भात सादरीकरण करण्यात आले होते. विकास आराखडा तयार करण्यासाठी मंगळवारी शहरात पाहणी करण्यात आली. यावेळी पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोरे, सल्लागार कंपनी कन्स्ट्रक्टवेल प्रा. ली. नवी मुंबईचे वास्तू विशारद केदार काटकर, वास्तू विशारद केतन रायकर, इतिहास तज्ञ प्रा. सतीश कदम, मंदिर संस्थानचे अभियंता राजकुमार भोसले आदींची उपस्थिती होती. यावेळी मंकावती तीर्थ, अहिल्याबाई, भगवती, गांडेची विहीर, कवठेकर विहीर, रामवरदायीनी, चंद्र कुंड, सुर्य कुंड, तुळजापूर खुर्द येथील पाण्याची विहीर आदींची पाहणी करण्यात आली.

भाविकांच्या सुविधेला प्राधान्य द्या
तुळजापूर विकास प्राधिकरणात प्राचीन लूकच्या नावाखाली महाद्वार परिसरात करण्यात आलेल्या दगडी पायऱ्या अडचणीच्या ठरल्या आहेत. हेरिटेज लूकचे पथदिवे बसवण्याचा अट्टाहासात शहर १० वर्षे अंधारात राहिले. या पार्श्वभूमीवर विकास आराखड्यात सर्व प्रथम सुलभ दर्शन, निवास, रस्ते, पार्किंग, स्वच्छता गृह आदी मुलभुत सुविधा पुरवण्यास प्राधान्य देण्याची गरज असल्याची मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...